THE गडविश्व
मुंबई : सुधारीत नवीन नियमावलीनुसार जिम आणि ब्युटीपार्लरवरील निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. 50 टक्के क्षमतेने जीम आणि ब्युटी पार्लर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण ही परवानगी देताना काही नवीन नियमांचे पालन करणे गरजेचे असणार आहे. यामध्ये जीम आणि ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्यांसह ग्राहकांनी लस घेणे गरजेचे आहे. या दोघांनी लसीचे दोन डोस घेतले असतील तरच त्यांना परवानगी मिळणार असल्याचे नवीन आदेशात सांगण्यात आले आहे.
दरम्यान, स्वीमिंग पूल, जिम, स्पा, वेलनेस सेंटर्स आणि ब्यूटी सलून्स बंद राहतील, असं आधीच्या आदेशात म्हटले होते. मात्र, या निर्णयाला मोठा विरोध करण्यात आला होता. जाहीर केलेल्या नवीन नियमावलीमध्ये थोडा बदल करून ब्युटी पार्लर सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र सलून व ब्युटी पार्लर असोसिएशनकडून करण्यात आली होती. राज्य सरकारने जाहीर केलेल्या नवीन नियमावलीमध्ये सलून व्यावसाय सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती पण जीम आणि ब्युटी पार्लरला परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे विरोध होत होता. तसेच आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. पण अखेर काही नियम घालून परवानगी देण्यात आली आहे.
तर हेअर कटींग सलून 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील असे कालच्या आदेशात म्हटले होते. ते आदेश कायम आहेत. हेअर कटिंग सलून रोज रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहतील. एकापेक्षा अधिक सुविधा असलेल्या आस्थापनांमध्ये इतर सुविधा बंद राहतील. हेअर कटींग सलून्सनी कोव्हिडरोधी वागणुकीचे काटेकोर पालन करावे तसेच केस कापणाऱ्या सर्वांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक आहे, असे आदेशात म्हटले आहे.