निष्ठापूर्वक कलेने सवाई गंधर्वांना आदरांजली !

226

सवाई गंधर्व- रामचंद्र कुंदगोळकर पुण्यस्मृती

त्या काळात बालगंधर्व यांच्या स्त्रीभूमिका अत्यंत लोकप्रिय असतानाही, कुंदगोळकरांच्या रूपाने स्त्रीभूमिका करणारा एक नवा गायक व नट रंगभूमीवर अवतीर्ण झाला व अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. या लोकप्रियतेमुळेच वऱ्हाडाचे नबाब म्हणून प्रसिद्ध असलेले दादासाहेब खापर्डे यांनी अमरावती येथे १९०८ साली त्यांना सवाई गंधर्व ही पदवी दिली व या टोपण नावानेच ते पुढे जास्त ओळखले जाऊ लागले. असा हा लेख अलककार- निकोडे कृष्णकुमार गोविंदा यांच्या शब्दशैलीत जरूर वाचा..

सवाई गंधर्वांच्या मृत्यूनंतर पंधरा दिवसांतच त्यांच्या तैलचित्राचे अनावरण पुणे येथील भावे हायस्कूलमध्ये श्रीमंत बाबूराव देशमुख यांच्या हस्ते झाले. तसेच पुणे येथील संभाजी उद्यानात सवाई गंधर्व यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण दि.९ जून १९६४ रोजी आचार्य अत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. सवाई गंधर्वांची पहिली पुण्यतिथी १९५३मध्ये आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे संगीताचा कार्यक्रम करून साजरी करण्यात आली. तेव्हापासून आजतागायत सवाई गंधर्व पुण्यतिथी संगीत महोत्सव पुण्यामध्ये जोमाने साजरा केला जातो. पंचवीस वर्षांनंतर त्याचे नाव बदलून तो सवाई गंधर्व संगीत महोत्सव या नावाने पुढे चालू राहिला. सवाई गंधर्वांचे शिष्य पं.भीमसेन जोशी यांचा महोत्सवाच्या संयोजनात प्रमुख वाटा असून त्यांनी सचिवपदाची धुरा आजतागायत समर्थपणे सांभाळली आहे. हा संगीत महोत्सव खुपच लोकप्रिय ठरला असून त्यात प्रतिवर्षी देशभरातील मान्यवर, नामवंत गायक, वादक, नर्तकादी कलावंत आपली कला निष्ठापूर्वक सादर करून सवाई गंधर्वांना आदरांजली वाहतात. सवाई गंधर्वांच्या जन्मगावी कुंदगोळ येथेही प्रतिवर्षी असाच संगीताचा कार्यक्रम करून त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते.
सवाई गंधर्व हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक थोर गायक व मराठी रंगभूमीवरील विख्यात गायक व नट होत. त्यांचे मूळनाव रामचंद्र गणेश कुंदगोळकर असे होते. त्यांचा जन्म दि.१९ जानेवारी १८८६ रोजी कुंदगोळ, जि.बेळगाव, कर्नाटक राज्य येथे झाला. त्यांची गायनाची आवड लक्षात घेऊन त्यांच्या वडिलांनी त्यांना सन १८९७-९८मध्ये बळवंतराव कोल्हटकरांकडे गाण्याची तालीम दिली. पुढे किराणा घराण्याचे प्रवर्तक अब्दुल करीमखाँ यांच्याकडे त्यांनी गायनाची कसून तालीम घेतली. त्याचप्रमाणे निसार हुसेनखाँ, हैदरबक्ष, मुराद खान यांच्याकडून त्यांनी चिजांचे शिक्षण घेतले. सन १९०८मध्ये त्यांनी अमरावतीस नाट्यकला प्रवर्तक मंडळीत गायक व नट म्हणून प्रवेश केला. त्यांत ते स्त्रीभूमिका करू लागले. त्या काळात बालगंधर्व यांच्या स्त्रीभूमिका अत्यंत लोकप्रिय असतानाही, कुंदगोळकरांच्या रूपाने स्त्रीभूमिका करणारा एक नवा गायक व नट रंगभूमीवर अवतीर्ण झाला व अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. या लोकप्रियतेमुळेच वऱ्हाडाचे नबाब म्हणून प्रसिद्ध असलेले दादासाहेब खापर्डे यांनी अमरावती येथे १९०८ साली त्यांना सवाई गंधर्व ही पदवी दिली व या टोपण नावानेच ते पुढे जास्त ओळखले जाऊ लागले. सवाई गंधर्व यांचा विशेष लौकिक झाला, तो हरिभाऊ आपटे यांच्या संत सखू नाटकातील सखूच्या भूमिकेमुळे. या लौकिकाच्या पाठबळावरच त्यांनी स्वत:ची नूतन संगीत नाटक मंडळी स्थापन केली व ती पुढे दहा वर्षे चालविली. त्यानंतर यशवंत संगीत मंडळीमध्ये व शेवटी हिराबाई बडोदेकरांच्या नूतन संगीत विद्यालयाच्या नाट्यशाखेत अशी स्थित्यंतरे केली. सन १९३२मध्ये त्यांनी नाट्यजीवनाला कायमचा रामराम ठोकला. या चोवीस वर्षांच्या नाट्यजीवनात त्यांनी केलेल्या सुभद्रा, तारा, संत सखू, कृष्ण आदी भूमिका विशेष गाजल्या. तसेच बघुनी उपवनी, असताना यतिसान्निध, व्यर्थ छळिले इत्यादी त्यांची नाट्यपदे खुपच लोकप्रिय झाली. तुलसीदास नाटकातील त्यांनी गायिलेले “राम रंगी रंगले मन…” हे भजनही अतिशय गाजले. सन १९३०नंतर संगीत रंगभूमीची सद्दी संपल्यावर सवाई गंधर्व हे शास्त्रीय संगीताच्या मैफलींकडे वळले. त्यांचा रंगभूमीवरील समृद्ध अनुभव, कल्पनाशक्तीची उत्तुंग भरारी, जास्त व विविध स्वप्नरंग वापरण्याची क्षमता व गायनातील समृद्ध भावरंगपट आदी अलौकिक गुणांमुळे त्यांचा संगीताविष्कार समृद्ध व प्रभावी ठरत असे. त्यांची रागाची बढत जास्त पद्धतशीर तसेच तानांमध्ये वैविध्य व लयकारीत आक्रमकता दिसून येई.
सवाई गंधर्वांचा आवाज मुळात गोड नव्हता; गळाही बोजड होता. परंतु त्यांनी अथक परिश्रम करून आपला आवाज कमावला आणि तो झारदार व सुरेल बनविला. ते ख्याल, तराणा, ठुमरी, भजन, नाट्यसंगीत असे विविध गानप्रकार उत्तमरीत्या सादर करीत असत. किराणा घराण्याच्या फिरतीत त्यांनी अधिक वैविध्य व गायकीत आक्रमकपणा आणून किराणा घराण्याची गानपरंपरा अधिक समृद्ध केली. त्यांच्या शास्त्रोक्त रागदारी गाण्यांच्या व नाट्यपदांच्या अनेक ध्वनिमुद्रिका एच्.एम्.व्ही.कंपनीने काढल्या. सन १९४२मध्ये त्यांना पक्षाघाताचा तीव्र झटका आला व परिणामत: पुढील दहा वर्षे त्यांचे गाणे पूर्णत: थांबले. पुणे येथे त्यांचे दि.१२ सप्टेंबर १९५२ रोजी निधन झाले. त्यांच्या शिष्यशाखेत गंगुबाई हनगल, भीमसेन जोशी, फिरोज दस्तुर, छोटा गंधर्व, मास्तर कृष्णराव आदी मान्यवर गायक-गायिकांचा समावेश होता.

!! The गडविश्व न्यूज परिवारातर्फे स्मृतिदिनी सवाई गंधर्वांना व त्यांच्या संगीतकलेला विनम्र अभिवादन !!

अलककार- निकोडे कृष्णकुमार गोविंदा.
रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली.
फक्त व्हॉटसॅप- ९४२३७१४८८३.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here