– अभ्यास करायला पुरेसा वेळ मिळणार नसल्याने होत आहे मागणी
The गडविश्व
नवी दिल्ली : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) पुढे ढकलण्याची मागणी देशाभरातील विद्यार्थी आणि पालकांनी राष्ट्रीय चाचणी संस्थेकडे (एनटीए) केली आहे.
१७ जून रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून ती सप्टेंबरमध्ये घेण्यात येत होती. मात्र यंदा तीन महिने आधीच घेतली जाणार असल्याने अभ्यास करायला पुरेसा वेळ मिळणार नाही. आम्ही माणसे आहोत, मशीन नाही, असेही विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
‘नीट’ परीक्षेसाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख ६ मे आहे. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर आपली मते व्यक्त करत ही परीक्षा ऑगस्टपर्यंत तरी पुढे ढकलली जावी अशी मागणी केली आहे. अकरावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमावर या परीक्षेत प्रश्न विचारले जातात. या दोन वर्षांचा अभ्यास करायला पुरेसा वेळ मिळायला हवा, असे विद्यार्थ्यांनी ट्विटरवर नमूद केले आहे.
सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा २६ एप्रिलपासून सुरू होत असून त्या १५ जूनपर्यंत चालणार आहेत. एकाच वेळी या दोन्ही परीक्षांची तयारी करणे अवघड आहे. इंजिनीयरिंगची जेईई परीक्षा वर्षातून चार वेळा घेतली जात आहे आणि ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच घेण्यात येते. त्यातच परीक्षेचा वेळही यंदापासून २० मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना ३ तास २० मिनिटांत म्हणजेच २००मिनिटांत १८०प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळे ती किमान एक महिना तरी पुढे ढकलावी, अशी विनंती विद्यार्थ्यांनी केली आहे.