पंढरपूर आषाढी वारी विशेष
आषाढी एकादशीसाठी पंढरपूर येथे जाणारी वारकरी पदयात्रा होय. वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा होय. वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय होय. या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जाति-धर्माचे लोक मराठा, सोनार, कुंभार, चांभार, माळी, महार, कुणबी, न्हावी, लिंगायत व इतर जातींचे भाविक भक्त सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात. वारी हा एक आनंद सोहळा असतो.
वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळी होते. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत. वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही. संतोक्ती साक्ष देते-
“पंढरीच्या लोका नाही अभिमान !
पाया पडती एकमेका होऊनी लहान !!”
वारी करणाऱ्या व्यक्तीस वारकरी म्हणतात. भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या पांडुरंगाचे- विठ्ठलाचे हे भक्त असतात. आपले कर्तव्यकर्म निष्ठेने करीत असता ते भगवंताचे विस्मरण होऊ देऊ नये यासाठी गळ्यात तुळशीची माळ घालतात. या माळेच्या जपमाळ म्हणून उपयोगाशिवाय, ती गळ्यात घातल्याविना वारकरी होता येत नाही, असे वारकरी पंथ सांगतो.
स्नान करून भाळी गोपीचंदनाचा टिळा लावावा. नित्यनेमाने हरिपाठ म्हणावा. संतांचे ग्रंथ वाचावेत. देवाच्या मूर्तीचे दर्शन घ्यावे. भजन-कीर्तनात सहभाग घ्यावा. पंढरपूरवारी करावी तसेच एकादशीव्रत करावे. वारकऱ्याने पंढरपूरमध्ये सात्त्विक आहार व सत्त्वाचरण करावे. परोपकार आणि परमार्थही करावा. जीवनातील बंधनातून, मोहातून हळूहळू बाजूस होऊन पांडुरंगाशी एकरूप व्हावे, नामस्मरण करावे, असा साधा आणि उघड परमार्थ वारकरी संप्रदायाने सांगितला आहे. नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी असतो. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते-
“पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान !
आणिक दर्शन विठोबाचे !!”
या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिलापुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे, असे मानले जाते.
वारकरी महावाक्य- वारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना- “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय !” असा जयघोष केला जातो. स्थानपरत्वे या जयघोषात पंढरीनाथ भगवान की जय, असाही भेद आढळतो. अनेक ठिकाणी माउली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय, शान्तिब्रह्म एकनाथ महाराज की जय अशीही विविधता आढळते. या जयघोषाला वारकरी महावाक्य किंवा वारकरी महाघोष म्हटले जाते. पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे. तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो. ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले. हेच व्यापक स्वरूप जपत पुढे संत एकनाथ महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत मल्लप्पा वासकर यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली. संत तुकाराम महाराज यांच्याही कुटुंबात वारीची परंपरा होती. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे म्हणतात- “पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म होय. वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे, किंबहुना वारकरी हे नावच वारीमुळे पडले आहे. वारीतून या संप्रदायाची सामाजिकता आणि समाजाभिमुखता स्पष्ट होते. वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केली आहे.” ज्ञानदेवांच्या कर्तृत्वामुळे हा संप्रदाय जनमानसावर प्रभाव गाजवून महाराष्ट्रव्यापी झाला; परंतु संप्रदायाचा आद्य प्रवर्तक ठरतो भक्त पुंडलिकच ! भक्त पुंडलिकापासून या संप्रदायाला इतिहासाला सुरुवात होते. या इतिहासाचे पुढील कालखंडांत विभाजन असे करता येईल- ज्ञानदेवपूर्व काळ- भक्त पुंडलिकाचा काळ, ज्ञानदेव-नामदेव काळ, भानुदास-एकनाथांचा काळ, तुकोबा-निळोबांचा काळ, तुकारामोत्तर तीनशे वर्षांचा काळ. म्हणून वारकरी पंढरीमहिमा गात गात जातात-
“जाता पंढरीशी सुख वाटे जीवा।
आनंदे केशवा भेटताचि।।
या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी।
पाहिली शोधोनि अवघी तीर्थे।।
सेना म्हणे खुण सांडी सांडी संती।
यापरती विश्रांती न मिळे जीवा।।
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला,
हरि ओम विठलाऽऽऽ…।।”
वारीच्या परंपरेची माहिती मुलांना विशेषतः पुढील पिढ्यांना होण्यासाठी बालगटाच्या शाळा ते माध्यमिक शाळा यांमध्ये आषाढी एकादशीच्या आधी वारीचे आयोजन केले जाते. विद्यार्थी-विद्यार्थिनी वारकरी पोशाख घालून येतात आणि पालखी सजवून त्यात विठ्ठल-रखुमाई यांची पूजा करून पालखी सोहळा साजरा करतात. शहरातील निवडक माध्यमिक शाळांतील मुले प्रत्यक्ष वारीमध्ये सहभागी होतात आणि वारकरी भक्तांशी संवाद साधतात, ठरावीक अंतर पायी चालून वारीचा अनुभव घेतात.
सायकल वारी- वारीतील विविध सुविधांची पाहणी करण्यासाठी २००० युवक सायकल वारी करतील अशी योजना २०१७ साली करण्यात आली. वारीतील गर्दीमुळे होणारी अस्वच्छता दूर करण्यासाठी वारीनंतर पंढरपुरात तसेच वारीमार्गावर स्वच्छता अभियान राबविले जाते.
पंढरपूरला जात असलेल्या वारकरी समुदायाची सेवा करण्याची संधी समाजाच्या विविध स्तरातून घेतली जाते. काही मंडळी वैयक्तिक किंवा कौटुंबिक स्तरावर अशी सेवा पुरवितात. ज्यामध्ये वारीच्या मार्गावर उभे राहून वारकऱ्यांना खाद्यपदार्थ पुरविणे, पाण्याची व्यवस्था, कपडे, वर्षावस्त्र देणे, अशी सेवा केली जाते. सामाजिक संस्था, औद्योगिक संस्था या सुद्धा त्यांना विविध सुविधा पुरवितात. यामध्ये त्यांची सेवा करणे एवढाच भाव नाही तर त्यांच्या रुपातील विठ्ठल परब्रह्माला पुजणे, असा भाव असतो. काही वैद्यकीय संस्था आणि रुग्णालये वारकरी भक्तांची शारीरिक चाचणी, आरोग्य व उपचार यांची काळजी घेतात. वारीसाठी भक्तांना वाहनांची सुविधा देण्यात येते. यासाठी शासकीय स्तरावर योजना राबविल्या जातात. पालकी मार्गाची पाहणी करणे, रस्त्यांची स्वछता, वैद्यकीय सेवा, पिण्याचे पाणी यांची व्यवस्था महाराष्ट्र शासनातर्फे केली जाते. चला, आपणही सुरात सूर मिसळत गाऊ-
“विठ्ठल विठ्ठल विठ्ठला,
विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाऽऽऽ…।
का गा ना येशी विठ्ठला।
ऐसा कोण दोष मला।।
दीनानाथ दीनबंधू।
जनी म्हणे कृपासिंधू।।”
वारी सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र परतवारी माहीत असणारे आणि ती करणारे लोक खूप कमी आहेत. वारी करताना जागोजागी पावलापावलांवर दानशूर लोक सोयी सुविधा उपलब्ध करून देतात. मात्र परतवारीच्या वेळी अतिशय कष्टप्रद प्रवास करावा लागतो. वारीला ग्लॅमर आहे, तर परतवारीला लाट ओसरून गेल्यानंतरचं उदासवाणे वातावरण बघावयास मिळते. परतवारीलाही वरीलप्रमाणे सर्व सोयी सुविधा व आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात अशी याद्वारे एक रास्त व माफक अपेक्षा!
संत चरणरज: श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.
(भारतीय संत-महापुरुषांच्या जीवनचरित्रांचे गाढे अभ्यासक.)
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी चौक- रामनगर, गडचिरोली.
फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.