– राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांचे निवेदन
The गडविश्व
मुंबई : राज्यातील पत्रकारांच्या विविध समस्या संदर्भात विधानभवनात विधानसभा अध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांना राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी नामदार झिरवाळ यांनी पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष पद्माकर घायवान , सचिव रविंद्र चरडे, महाराष्ट्र प्रदेश संघटक प्रफुल्ल मेश्राम, यवतमाळ जिल्हा संघटक रत्नपाल डोफे, दिंडोरी तालुका संघटक राहुल कस्तुरे, प्रशांत इघे उपस्थित होते.
पत्रकार संघाच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात गाव, शहर, तालुका व जिल्ह्यातील शासकीय समित्यांमध्ये अशासकीय सदस्य पदी व धर्मदाय अंतर्गत असणार्या देवस्थान समित्यांमध्ये पत्रकारांच्या नियुक्तया करण्यात याव्या. राज्यात निर्भीड पत्रकारिता करणार्या पत्रकारांवर वाळू माफिया, गौण खनिज माफिया, अवैध व्यावसायिक, भ्रष्ट लोकप्रतिनिधी, भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी तसेच गाव गुंडांकडून होणारे प्राणघातक भ्याड हल्ले रोखण्यासाठी पत्रकार संरक्षण कायदा २०१९ ची प्रामाणिकपणे कडक अमलबजावणी व्हावी. तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी पत्रकार वसाहती, पत्रकार भवन, पत्रकार विश्रांती गृह बांधण्यात यावे. पत्रकारांना मोफत आरोग्य विमा संरक्षण मिळावे, पत्रकार प्रवास करत असलेल्या वाहनांना टोल माफी मिळावी. यासह विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदना बाबत सकारात्मक प्रतिसाद देत आगामी विधिमंडळात विषय ठेवण्याचे आश्वासन विधानसभा अध्यक्ष यांनी यावेळेस दिले. या वेळी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संचालित विश्वगामी पत्रकार मंत्रालय समितीचे सदस्य उपस्थित होते.