The गडविश्व
सावली : गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प अंतर्गत विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर आणि मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था, मुंबई विद्यापीठ यांच्या वतीने पाणी वापर संस्था सक्षमीकरण करिता गोसेखुर्द उजवा कालवा उपविभाग क्रमांक ०६ आणि आसोलामेंढा कालवे उपविभाग ब्रम्हपुरी विभागातील २० पाणी वापर संस्थांचे एकदिवसीय लेखापरीक्षण शिबीर सावली तालुक्यातील गेवरा बुज येथील सेवा सहकारी संस्थेत २७ जानेवारी २०२२ रोजी पार पडले. यावेळी लेखापरीक्षक लकी छाबडा, मुंबई विद्यापीठाचे प्रकल्प स्तरीय समन्वयक शशांक रायबोर्डे, गट समन्वयक आशिष दुधे, सामाजिक कार्यकर्ता संजय इंगळे, सामाजिक कार्यकर्ता मनोज कोरडे, प्रशिक्षक अमोल गडदे, क्षेत्रीय समन्वयक राहुल सिंगनजुडे, विश्वास मेश्राम आणि २० पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते. या सर्व पाणी वापर संस्था सन २०१९-२०२० मध्ये स्थापन झालेल्या आहेत. ब्रम्हपुरी विभागीय कार्यालयापासुन या संस्था ६०-७० किलोमीटर दूर असल्याने एकाच वेळी एकाच ठिकाणी सर्वांना सोयीस्कर होईल असे मध्यवर्ती ठिकाण मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था मुंबई विद्यापीठाच्या अधिकार्यांनी निवडले होते.
यावेळी प्रकल्प समन्वयक शशांक रायबोर्डे यांनी पाणी वापर संस्था सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने मुंबई विद्यापीठाने तयार केलेल्या दश सूत्री मधील सूत्र क्रमांक ०५ नियमित लेखे अद्ययावत ठेवणे या विषयावर विस्तृत प्रशिक्षण देण्यात आले. ज्यात रोकडवही, जडसंग्रह, नफा तोटा पत्र, मक्ता व दायित्व, पाणी मागणी, पाणीपट्टी बिल, सभासदाच्या नोंदी या कार्यालयीन दस्तऐवज बाबींवर विस्तृत भाष्य केले. तसेच लेखापरीक्षक लकी छाबडा यांनी संस्थांच्या लेखापरीक्षण संदर्भात लेखापरीक्षणाचे महत्त्व, गरज व फायदे समजून सांगितले. शेवटच्या सत्रात मुक्त परिसंवाद घेण्यात आला. यावेळी उपस्थितांनी काही अडचणी मांडल्या. ज्यात एकसुराने असा निष्कर्ष दिसून आला की विभागाकडून संस्थांशी सतत समन्वय घडून येणे गरजेचे आहे.
या लेखापरीक्षण शिबिराचे संचलन गट समन्वयक आशिष दुधे यांनी केले. शेवटी आभार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पाणी वापर संस्थेचे सचिव ऐरावत रामटेके यांनी मानले.
या शिबिराच्या आयोजनासाठी मुंबई विद्यापीठाचे अधिकारी चमू आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पाणी वापर संस्था, गेवरा बूज यांचे विशेष सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. किरण चन्नवार यांनी विशेष मेहनत घेतली.