– स्वच्छतेत शासकीय विभागांपाठोपाठ आता शाळांचाही सहभाग
Theगडविश्व
सिरोंचा : पुष्कर पर्व सिरोंचा येथे बारा वर्षानंतर संपन्न होत आहे. यावेळी पहिल्या दिवसांपासून कित्येक हजारो भाविक पवित्र स्नान करण्यासाठी प्राणहिता नदीकाठावर गर्दी करीत आहेत. भाविकांच्या गर्दीमूळे त्याठिकाणी निर्माल्य व कचरा मोठ्या प्रमाणात इतरत्र पडल्याचे आढळून येते. अशा वेळी पुष्करचे नोडल अधिकारी तथा अति. जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांच्या संकल्पनेतून सर्व शायकीय विभागांनी स्वच्छता मोहिम प्रथम राबविली. आता यातूनच आसपासच्या शाळा महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला आहे. यामध्ये राजे धर्मराव महाविद्यालय, सिरोंचा, श्रीनिवास हायस्कुल अंकीसा, सी व्ही रमण महाविद्यालय, सिरोंचा, भगवंतराव कला महाविद्यालय, सिरोंचा तसेच सिरोंचा सेवा समिती यांनी दैनंदिन स्वरूपात नदीघाट स्वच्छ करण्यासाठी सहभाग घेतला आहे. तसेच यापुर्वी शासनाच्या महसूल, बांधकाम विभाग, कृषी विभाग व नगर पंचायत विभागाने स्वच्छता मोहिम राबविली होती. यामूळे जणू काही स्वच्छतेची वारीच सिरोंचा येथे प्राणहिता काठी आल्याचे चित्र आहे.
या स्वच्छतेच्या मोहीमेमूळे आता भाविकही निर्माल्य व इतर कचरा डस्टबीनमध्ये टाकताना दिसत आहेत. सिरोंचा घाटावर विविध दुकाने लागली आहेत. त्या ठिकाणी भाविकांना बसण्यासाठी सावलीची मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली आहे. विविध सेवाभावी संस्थांकडून आहार वितरीत केला जात आहे. यामूळे परिसरात कचरा निर्माण होत आहे. सफाई कर्मचाऱ्यांना एवढया मोठ्या प्रमाणात कचरा उचलणे शक्य नसल्याने व स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी सदर संकल्पना धनाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. तहसिलदार सिरोंचा जितेंद्र शिकतोडे यांनी याबाबत नियोजन करून स्वच्छतेसाठी विविध संस्था, शाळांना एकत्रित आणण्याचे कार्य केले.
नदीघाटावर नदीमधील स्वच्छ पाण्याची आंघोळीसाठी सुविधा – नदीतील गढूळ पाणी स्वच्छ ठेवणेसाठी नवीन मोटर पंप सेट करून त्याठिकाणी भाविकांना स्वच्छ पाण्यात अंघोळ करता येईल असे नियोजन धनाजी पाटील अति. जिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी पुष्कर यांच्या सूचनेनुसार करण्यात आलेली आहे. भाविकांना नदीपात्रात अंघोळ करण्यास अडचणी असल्यास त्यांचे साठी बाहेर सुविधा निर्माण करण्यात आली होती. परंतू गर्दीमूळे पाणी गढूळ झाल्याने बाहेरील पाणीही गढुळच मिळत होते. आता स्वच्छ पाण्यासाठी घाटापासून थोडे दूरचे पाणी स्वतंत्र पंपाद्वारे आंघोळीसाठी उपलब्ध केले जात आहे.