“आज़ाद ख्याल ” या हिंदी काव्यसंग्रहाला प्रथम वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विशेष लेख
मला नेहमीच सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न
तुम्ही तुमचं नाव का बदलेलं ?
मी कधीच माझं नाव बदलेलं नाही. कु. पूजा गुरुदेव बाळेकरमकर ही माझ्या आई-वडिलांनी मला दिलेली ओळख आहे. ही ओळख मी वयाच्या वीस वर्षापर्यंत जपलेली आहे. पण लेखिका स्वाधीनता बाळेकरमकर हे स्वकष्टाने, मेहनतीने मी स्वतः निर्माण केलेलं माझं अस्तित्व आहे.
वयाच्या विसाव्या व्या वर्षी मला पहिल्यांदा पडलेला प्रश्न
तू कोण आहेस ? गुरुदेव बाळेकरमकर आणि छाया बाळेकरमकर ह्यांची मुलगी एवढीच तुझी ओळख आहे पण या व्यतिरिक्त तुझं स्वतःच अस्तित्व काय?
या प्रश्नामुळे सुरुवात झाली एका नव्या प्रवासाची. माझ्यासाठी लहानपणापासून लेखन हेचं व्यक्त व्हायचं मध्यम होत. बाबांनी वयाच्या सहाव्या वर्षापासूनच वृत्तपत्र नियमित वाचायची शिस्त लावली.या शिस्तीमुळे वाचनाची आणि लिहिण्याची आवड बालवयात निर्माण झाली. लहानपणीचं ठरवलं लेखिका होणे माझं स्वप्न असेल. वयाच्या विसाव्या वर्षी कळलं बघितलेलं स्वप्न साकार करण्याची तुझं स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याची हीच वेळ आहे. मी आवड म्हणून “युवर कॉट” अँप वर लिहीत असतांना या अँप च्या माध्यमातून लेखकांच्या एका मोठ्या कुटुंबाशी जोडले गेले. मी अनेक क्षेत्रातील लोकांचा एकमेकांना प्रतिस्पर्धी समजून त्यांच्या पुढे जाण्याचा अट्टहास बघितला. पण , मी ज्या लेखकांच्या कुटुंबाशी जोडले गेले तेथे एकमेकांना मार्गदर्शन करतांना, सल्ला देतांना अनुभवलं. त्यांच्या मनात एकमेकांविषयी सहकार्याची भावना होती. पुढे याच लेखक कुटुंबाच्या माध्यमातून मी माझे लेख, कविता मासिकात प्रकाशित करू शकले. यादरम्यान अनेक अंथॉलॉजीज मध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. आता मला माझे स्वतःचे पुस्तक स्वकमाईने प्रकाशीत करायचे होते. यासाठी मी एका व्यायामशाळेत रिसेप्शनिस्ट म्हणून काम करू लागले. अनेकांनी यासाठी माझ्या आईवडिलांवर टीका केली. तुम्हाला काहीच कमी नसतांना तुम्ही मुलीला शिक्षण घेत असतांना का नोकरी करू देत आहात? असे प्रश्न विचारले. पण माझ्या आई वडिलांनी माझा निर्णयात कधीच हस्तक्षेप केला नाही याचं कारण त्यांचा माझ्यावर असणारा विश्वास. कुठलेच काम हे छोटे मुळीच नसते. उलट माझ्या लेखिका होण्याच्या यशात माझा या कामाचा मोलाचा वाटा आहे. मी रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरी करतांना रोजच माझा संबंध शंभर ते दीडशे लोकांशी यायचा. त्यामुळे मी लोकांसमोर स्वतःचे मत प्रभावीपणे मांडायला शिकले. माझ्या कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप झाल्या. पुढे लॉकडाऊनमुळे मी ती नोकरी सोडली. याच काळात मी “आज़ाद ख्याल ” नावाचा हिंदी काव्यसंग्रह लिहिला. रिसेप्शनिस्ट म्हणून काम करताना मिळालेला मोबदला हा पुस्तक प्रकाशित करण्यासाठी पुरेसा होता. लॉकडाऊन काळात कुठेही न जाता अगदी घरी बसून मी ऑनलाईन टी .झेड.पी पब्लिकेशन्स दिल्ली यांच्याद्वारे
“आज़ाद ख्याल ” हे हिंदी काव्यसंग्रह प्रकाशित करू शकले. ५ जुलै २०२१ ला “आज़ाद ख्याल ” या हिंदी काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडला. त्या क्षणी मी पूजा गुरुदेव बाळेकरमकर ची लेखिका स्वाधीनता बाळेकरमकर झाले. त्यानंतरही सकाळ , देशोन्नती वृत्तपत्रात माझे लेख प्रकाशित झाले. या वृत्तपत्रांच्या माध्यमातून वाचकांचा उत्तम प्रतिसाद मला मिळाला आणि मी खऱ्या अर्थाने लेखिका स्वाधीनता बाळेकरमकर म्हणून माझे अस्तित्व निर्माण केले.
“आज़ाद ख्याल” काव्यसंग्रह ऍमेझॉन वर उपलब्ध आहे.