The गडविश्व
प्रतिनिधी / पेंढरी, २१ सप्टेंबर : रस्ते हे देशाच्या विकासाचे प्रतिक आहेत. रस्त्यावरुन देशाच्या विकासाची संकल्पना ठरविली जाते. स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेनचे स्वप्न बघणाऱ्या देशात नागरिकांना जायला धड रस्ता नाही. नागरिकांना कोसोदूर पायदळ पायपीट करावी लागते. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही नागरिकांना रस्त्यासाठी संघर्ष करावा लागतो. मात्र तरीही नागरिकांच्या जिवाचे हाल थांबायला तयार नाही. अश्यात धानोरा तालुक्यातील पेंढरी-चातगाव-धानोरा हा मुख्य मार्ग असून पेंढरी-धानोरा हा रस्ता जवळपास ६० किमी आहे. चातगाव-धानोरा हा १८ किमीचा रास्ता सुरळीत असून पेंढरी ते चातगाव या रस्त्याचे तिनतेरा वाजल्याने अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे रस्त्याचे भाग्य उजळणार कधी, हा जनतेचा प्रश्न गेल्या अनेक वर्षानंतरही अनुत्तरीतच आहे. रस्ते आणि विकास हे दोन्ही शब्द अगदी जवळचे आहे. मात्र हे दोनही शब्द एकमेकांपासून कोसोदूर गेल्याचे दिसून येते. अशात पेंढरी-चातगाव रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहे, रस्त्याची पूर्णतः चाळण झाली असून याकडे मात्र प्रशासन कानाडोळा करतांना दिसत आहे।
धानोरा तालुक्याचा बहुतांश भाग हा पेंढरी, गट्टा या भागात विस्तारलेला आहे. तालुक्याला जायला हा एकमेव राज्यमार्ग असल्याने नागरिकांची व वाहनांची या रस्त्याने चांगलीच वर्दळ असते. या रस्त्याला मोठ मोठे खड्डे पडल्याने एक शेततळे निर्माण झाल्याचे दिसते. अशात या रस्त्यावरून जाताना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक अपघात होत आहेत. या रस्त्यावरुन चालताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. पेंढरी-चातगाव हा मार्ग तर खड्ड्यांचा मार्ग म्हणून ओळखला जात आहे, या मार्गावर एवढे खड्डे पडले आहेत की या मार्गावरुन प्रवास करणे नागरिकांच्या नाकीनऊ येत आहे. या रस्त्यावर अनेक अपघात घडल्याचे घटना घडत आहेत यावरुन या रस्त्यावर किती मोठ्या प्रमाणात खड्डे असेल, याचा सहज अंदाज बांधता येतो. रस्त्यांवरील खड्ड्यामुळे रस्ता अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रस्त्यातील खड्डेच आता नागरिकांच्या जिवावर उठले आहे. मात्र सामान्य माणूस मेला काय नि वाचला काय, याचे कोणालाही सोयरसुतूक नाही. या रस्त्याची एवढी मोठी दूरवस्था झाली आहे की हजारो खड्डे नागरिकांच्या जिवाला कारणीभूत ठरत आहे. रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत असेल तर या देशातील नागरिकांचे सर्वात मोठे दुर्दैव कोणते, हा प्रश्न आता सामान्य नागरिकांनाच छळायला लागला आहे.
लोकप्रतिनिधींनी जनतेच्या समस्या सोडवाव्या राज्यात आणि केंद्रात भाजपा सरकार सतेत आहे. जनतेच्या समस्या सोडविण्याची संधी सरकारमधील लोकप्रतिनिधींना आहे. रस्ता ही नागरिकांची मुलभूत समस्या असताना याकडे सरकार गांभीर्याने का पाहत नाही, हा जनतेचा सवाल असून सदर रस्त्याचे अच्छे दिन कधी येणार, हा खरा प्रश्न आहे.