पोलीस अधीक्षक अंकीत गोयल ‘अरुण बोंगीरवार पब्लिक सर्विस एक्सलन्स अ‍ॅवॉर्डस २०२१’ पुरस्काराने सन्मानित

596

– पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्काराने सन्मानित

THE गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यातील आदिवासींना सरकारी योजनांचे लाभ देण्यासाठी राबवलेल्या एक खिडकी योजनेबद्दल भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी व गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणाऱ्या ‘अरुण बोंगीरवार पब्लिक सर्विस एक्सलन्स अ‍ॅवॉर्डस २०२१’ ने सन्मानित करण्यात आले. यांच्यासह पुण्यातील कोरोना व्यवस्थापनासाठी राबवलेल्या प्रभावी यंत्रणेबद्दल भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी रुबल अगरवाल यांना सुद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
काल ६ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता युट्युब च्या माध्यमातून पुरस्कार सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते. यावेळी यशदाचे महासंचालक एस. चोक्किलगम, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर, अरुण बोंगीरवार फाउंडेशनच्या अध्यक्ष लता बोंगिरवार, निवृत्त सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लता बोंगीरवार यांनी केले तर आभार सनदी अधिकारी पियुष बोंगीरवार यांनी केले.
गडचिरोली हा दुर्गम भाग आहे. तेथील अनेक तालुक्यांमध्ये दळणवळणाची साधने ही खूप अपुरी आहेत. त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ नीट पोहोचत नाही. त्यातून सरकार आणि आदिवासी यांच्यात संवाद आणि समन्वयाचा अभाव तयार झाला आहे. ती दरी दूर करण्यासाठी व सरकार आणि आदिवासी यांच्यात एक सेतू म्हणून काम करण्यासाठी आम्ही ‘पोलीस दादालोरा खिडकी’ म्हणजे एक खिडकी योजना राबवली. त्यातून जात प्रमाणपत्रांसह विविध सरकारी प्रमाणपत्रे-कागदपत्रे आदिवासींना दिली. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना यासारख्या विविध योजनांचे लाभ आदिवासींना मिळवून दिले. वर्षभरात जवळपास १ लाख ९ हजार आदिवासींना आम्ही या एक खिडकी योजनेचा लाभ देऊ शकलो. त्यातून सरकारबद्दल आदिवासींची भावना बदलत आहे. नक्षलवादाकडे ओढा कमी होत आहे, असे सांगत पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पुरस्काराबद्दल आभार मानले. पुढच्या टप्प्यात आदिवासी महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून तेथे रोजगार आणि उत्पन्नाची साधने तयार करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही पोलीस अधीक्षक अंकित गोयल म्हणाले.

या युट्युब लिंक वर दाखवण्यात आले लाइव्ह प्रक्षेपण
https://youtu.be/X99Naeu56RY

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here