– घटनास्थळावरून शस्त्रे आणि स्फोटके जप्त, ठार झालेल्या नक्षलींवर लाखोंचे होते बक्षिस जाहीर
The गडविश्व
दंतेवाडा : छत्तीसगडच्या दंतेवाडा आणि सुकमा जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील काटेकल्याण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील व जियाकोर्था, गोर्ली आणि मुथेली जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमक उडाली. या चकमकीत २ महिला नक्षलींना कंठस्नान घालण्यात पोलीस दलास यश आले आहे. दरम्यान घटनास्थळावरून शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.
पेडारस एलओएस कमांडर मंजुला आणि डीव्हीसी सुरक्षा दल सदस्य मुचाकी गंगी अशी चकमकीत ठार झालेल्या नक्षलींची नावे असल्याचे कळते.मिळालेल्या माहितीनुसार, दंतेवाडा आणि सुकमा जिल्ह्यांतील सीमावर्ती भागातील जियाकोर्था, गोर्ली आणि मुथेली या जंगलांमध्ये आणि काटेकल्याण पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात नक्षली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे दंतेवाडा डीआरजी, सुकमा डीआरजी, सीआरपीएफ यांचे संयुक्त दल काल मंगळवारी शोध मोहिमेवर निघाले असता सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास गोर्ली आणि मुठेली दरम्यानच्या जंगलात सुरक्षा दल आणि नक्षल्यांमध्ये भीषण चकमक झाली.
या चकमकीनंतर सुरक्षा दलांनी घटनास्थळाची झडती घेतली असता घटनास्थळावरून २ महिला नक्षल्यांचे मृतदेह सापडले. तसेच ३ भरमार , २ टिफिन बॉम्ब , स्फोटके आणि नक्षल्यांचे कॅम्पिंग साहित्य जवानांनी जप्त केले आहे. चकमकीत ठार झालेल्या पेडारस एलओएस कमांडर मंजुला पुनम हिच्यावर ६ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर होते तर डीव्हीसी सुरक्षा दल सदस्य मुचाकी गंगी हिच्यावर १ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर होते. या चकमकीतनंतर सुरक्षा दलांकडून आजूबाजूच्या परिसरात तीव्र शोधमोहीम राबविण्यात आली.