– मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता
The गडविश्व
सुकमा : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातआज रविवारी सकाळच्या सुमारास चिंतलनार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलिस आणि नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत १ नक्षलीचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. घटनास्थळी अजूनही शोधमोहीम सुरु असून मृतक नक्षलींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सुकमाचे एसपी सुनील शर्मा यांनी या चकमकीला दुजोरा दिला आहे.
प्राप्त माहितीनुसार, या परिसरात रास्ताकाम सुरू आहे. नेहमीप्रमाणे, आज रविवारी सकाळी, कोब्रा 201 आणि DRG कर्मचारी रस्त्याच्या रक्षणासाठी तिम्मापुरमच्या दिशेने निघाले होते. दरम्यान दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. जवानांनीही चोख प्रत्युत्तर देत नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला. सुमारे अर्धा तास चाललेल्या या चकमकीत एक नक्षली ठार झाला आहे. जवानांना वाढता दबाव पाहून नक्षल्यांनी जंगलाच्या दिशेने पळ काढला. दरम्यान घटनास्थळाची शोधमोहीम केली असता एका नक्षलींचा मृतदेह सापडला आहे. यासोबतच मोठ्या प्रमाणात नक्षल्यांचा मालही जप्त करण्यात आला आहे. तसेच या चकमकीतील मृतक नक्षलींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.