पोलीस विभागासह विविध शासकिय विभागाने अवैध दारू व तंबाखू नियंत्रणासाठी प्रयत्न करावे : एसडीपीओ साहिल झरकर

342

The गडविश्व
गडचिरोली : शहरात कुरखेडा, वडसा आणि कोरची तसेच मोठ्या गावांत जिथे पोलीस पोहचू शकतात अशा ठिकाणी विशेष पथक निर्माण करून व नियोजन करून अवैध दारू विक्रेत्यावर पोलीस विभाग कडक कारवाई करेल असे एसडीपीओ साहिल झरकर हे कुरखेडा येथे झालेल्या बैठकीत म्हणाले.
कुरखेडा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात शनिवारी मुक्तिपथ व पोलिस विभागाची झोनल संयुक्त बैठक पार पडली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर, मुक्तिपथचे उपसंचालक संतोष सावळकर, कोरचीचे पोलिस निरीक्षक अमोल फडतरे, कुरखेडाचे पीएसआय कुलदीप सोनटक्के, देसाईगंजचे पीएसआय लांडे, पुराडाचे एपीआय भूषण पवार, देसाईगंज तालुका संघटिका भारती उपाध्ये, अनुप नांदगिरवार, कुरखेडाचे तालुका उपसंघटक मयूर राऊत, प्रेरक पांडे, संग्राम सावंत उपस्थित होते.
या बैठकीत विविध मुद्यावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. जसे दारू विक्रेत्यावर ९३ चा बाँड करून रक्कम आकारणे , उत्पादन शुल्क विभाग यांच्या द्वारे कारवाई करणे, संबधित विभागाशी पत्रव्यवहार करणे ज्या किराणा दुकानात कायद्याने मनाई असलेला तंबाखू विकला जातो, अन्न व औषधी विभागाची मदत घेऊन अशा दुकानाचे परवाने रद्द करणे. होलसेल तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करणे, संबधित पथकांची मदत घेणे. अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्यासंदर्भात उत्पादन शुल्क विभागाशी पत्रव्यवहार करणे. ग्रामसभेच्या माध्यमातून गावातील दारूविक्रेत्यांना तडीपार करण्याकरिता पुढाकार घेणे. तालुक्यातील उपविभागीय महसूल अधिकारी यांना भेटून ९३ च्या प्रस्तावानुसार कारवाई करण्यास कोणती अडचण येत आहे यासंदर्भात चर्चा करणे व त्या प्रक्रियेला गती आणणे, अन्न व औषध प्रशासन, पोलीस विभाग, तहसीलदार व उपविभागीय महसूल अधिकारी यांनी संयुक्त बैठक लावून अवैध दारू व तंबाखू नियंत्रणासाठी उपायाबाबत चर्चा करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here