– केंद्रीय संचार ब्यूरो, वर्धा यांचा उपक्रम
The गडविश्व
गडचिरोली, २९ सप्टेंबर : पोषक आहारा अभावी विविध रोगांचा सामना आपल्यालाला करावा लागत आहे. त्याकरीता आरोग्य सुदृढ बनविण्यासाठी पोषक आहार घेणे गरजेचे आहे. पोषक आहाराची जनजागृतीला लोकचळवळ बनवावी, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत यांनी केले.
माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, वर्धा, महिला व बाल विकास विभाग, गडचिरोली आणि समिधा कॉलेज ऑफ सिव्हिल सर्विसेस, अडपल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली मधील अडपल्ली समिधा कॉलेज ऑफ सिव्हिल सर्विसेस येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
याप्रसंगी मंचावर केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय वर्धाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी तथा क्षेत्रीय कार्यालय नागपूरचे प्रभारी सहायक संचालक हंसराज राऊत, बाल विकास प्रकल्प अधिकारी एन. आर. परांडे, के.व्ही.के.च्या डॉ. निलीमा पाटील, अडपल्लीच्या पोलिस पाटील सपना रायपुरे, महाविद्यालयाचे संचालक कालिदास राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी रोहिदास राऊत म्हणाले की, सध्याच्या धावपळीच्या युगाच स्वतःचे आरोग्य उत्तम राखणे एक आव्हान बनले आहे. सुदृढ समाज घडविण्यासाठी स्वतःपासून सुरूवात करणे आवश्यक आहे. त्याकरीता पोषण आहाराला घराघरापर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. तरच आपण कुपोषण मुक्त भारताचे स्वप्न पुर्ण करू शकणार आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
नलिनी पाटील म्हणाल्या, गरोदर मातेचे आरोग्य चांगले असेल, तरच तिच्या बाळाचे आरोग्य चांगले राहून बाळ कुपोषण मुक्त राहणार. त्याकरीता महिलांनी घरतील मंडळींचे आरोग्य सांभाळण्याबरोबरच स्वतःचेही आरोग्य सांभाळणे आवश्यक आहे. रोजच्या आहारात विविध प्रकारचे प्रथिने, फळ व भाज्या नियमित सेवन करणे आवश्यक आहे. जंक फु़ड टाळून पोषक आहार घेणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
परांडे म्हणाले की, कुपोषण थांबविण्यासाठी गरोदर माता व बाळाची काळजी घेणे आवश्यक आहे. आहारात सर्व प्रकारचे प्रोटीनयुक्त पदार्थ घ्यावे, तसेच फळांचा समावेश करावा. तरच आपण भारताला आरोग्याच्या बाबतीत सुदृढ बनवू शकणार, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
प्रास्ताविक क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी केले. संचालन योगिता खोब्रागडे यांनी केले. तर आभार कालिदास राऊत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी क्षेत्रीय प्रचार अधिकारी कार्यालयाचे संजय तिवारी, चंदू चड्डुके यांच्यासह आंगणवाडी सेविका आणि मदतनिस यांनी परिश्रम घेतले.
स्पर्धेतील विजेत्यांची नावे
चित्रकला स्पर्धा:- 1) रागिनी दिवाकर लेणगुरे, प्रथम बक्षीस 2)आरती यशवंत मेश्राम, द्वितीय बक्षीस 3)दीक्षा चोखा रायपुरे, तृतीय बक्षीस, रांगोळी स्पर्धा 1)अक्षिनी गजानन मारभते, प्रथम बक्षीस 2)काजल जांभुळकर, द्वितीय बक्षीस 3)काजल बंडू खोब्रागडे, तृतीय बक्षीस, पाककला स्पर्धा 1)पुष्पा धानोलकर, प्रथम बक्षीस 2)शारदा मेश्राम, द्वितीय बक्षीस 3)किरण म्हशाखेत्री, तृतीय बक्षीस.