The गडविश्व
मुंबई : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे काम राज्यात उत्तम सुरु असून ८ लक्ष ८६ हजार शेतकरी कुटुंबांची माहिती अद्ययावत करण्यासाठी २५ मार्चपासून संपूर्ण राज्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची घोषणा कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत केली.
विधानसभेत सर्वश्री देवेंद्र फडणवीस, अभिमन्यू पवार आणि अन्य सदस्यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले की, केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राज्यात राबविण्यात येत असून या योजनेची महसूल, कृषि, ग्रामविकास आणि सहकार या विभागांच्या माध्यमातून संयुक्तपणे राज्यात अंमलबजावणी सुरु आहे. या योजनेचा लाभ सर्व लाभार्थी शेतकरी कुटुंबांना मिळावा यासाठी पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांची माहिती अद्ययावत करुन ती पीएम-किसान पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे. थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) द्वारे नोंदणीकृत पात्र लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येत असून १५ मार्च २०२२ अखेर एकूण १०९.३३ लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण १८१२०.२३ कोटींची रक्कम डीबीटीद्वारे जमा करण्यात आली आहे, असेही कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले.
केवायसी आणि आधार लिंक करण्यासाठी ३१ मे पर्यंत मुदत देण्यात आली असून पात्र लाभार्थींना लाभ देण्याचे नियोजन करण्यात आल्याचेही कृषिमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. या चर्चेत सदस्य अभिमन्यू पवार यांचेसह राधाकृष्ण विखे-पाटील, ॲड. राहुल कुल आदींनी भाग घेतला.