प्रेमळ शांत स्वभाव ; तितकाच संत सेवाभाव !

343

(संतश्रेष्ठ आशाताई जयंती सप्ताह विशेष.)

_संत नेहमी जगाला प्रेमाचे दान करतात. स्वतः जळून मेणबत्तीप्रमाणे इतर मानवांना प्रकाश देतात. अंधार असो वा प्रकाश, दोन्ही परिस्थितीत ते प्रसन्न चित्ताने प्रकाशाचीच उधळण करित असतात. संतश्रेष्ठ आशाताई निकोडे या अशाच सेवाभावी संत होऊन गेल्या. पावन जयंती सप्ताहात त्यांचे गुणगौरव करणारी माहिती श्री एन. के. कुमार, से.नि.अध्यापक यांच्या शब्दशैलीतून उजागर करण्याचा हा छोटासा प्रयत्न…

दुर्जन कोण, सज्जन कोण? सर्व मानवमात्रांशी सदवर्तनच घडले पाहिजे, असा अट्टाहास बाळगणाऱ्या संतश्रेष्ठ आशाताईने आपल्या आचरणातून जगाला दाखवून दिले. आग ओकणाऱ्या अग्नीवर पाणी न ओतता तिला शांत कसे काय करावे? याचे उत्तर फक्त संतांजवळच असते. म्हणूनच कवी म्हणतो-
“आग लगी आकाश में,
झड़ झड़ गिरे अंगार।
सन्त ना होते जगत में,
तो जल मरता संसार।।”
संतशिरोमणी आशाताई आपल्या गोड वाणीद्वारे मार्गदर्शन करताना म्हणत, की मनुष्य जन्म वारंवार मिळत नाही. आम्ही माणसाच्या पोटी जन्माला आलो तर माणसांशी प्रेमानेच बोललो पाहिजे. सर्वांशी गुण्यागोविंदाने वागून माणुसकी जपली तरच आपल्या जन्माचे- मानवी जीवनाचे खऱ्या अर्थाने सोने करू शकू-
“तुला मानवा या ठायी, जन्म पुन्हा पुन्हा नाही!
बहु मोलाचे लाभले जीवन, माणसा तू माणूस बन!!
कर्मशून्य अर्थ त्या कथनीला नाही!
शोभेल का नाकच त्या नथनीला नाही!!
नाही कामाचे नुसते कथन, माणसा तू माणूस बन!!”
संतश्रेष्ठ आशाताई आपल्या सहकारी महान परोपकारी भगिनींच्या बरोबर सेवा, सत्संग व सुमिरण यांत सदैव तत्पर असत. आपला प्रपंच नेटका व सुखमयी करता करताच त्यांनी परमार्थही प्राणपणाने प्रज्ज्वलित केला. संत्संगात त्या नेहमी गीत गात असत-
“वदनी वदावी सदा अमृत वाणी।
जीवन बनवी देवा निर्मळ पाणी।।
देव पाहिल्यावर देवासारखे।
निर्मळ हे मन पाहिजे, हे जीवन पाहिजे।।”
संतश्रेष्ठ आशाताईचा जन्म दि.१८ मे १९७१ रोजी गरीब शेतकरी संत तुळशीराम गुरनूले व संत पार्वताबाई या दांपत्याच्या कुटुंबात झाला. त्यांचे जन्मगाव विदर्भातील गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील देलोडा बुजरूक हे होय. जन्मापासूनच त्या साध्या, सुहास्य वदन, प्रेमळ, संवेदनशील मनाच्या व सद्गुणी होत्या. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण जन्मगावीच पूर्ण केले. उच्च प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी त्या इतर शाळकरी मुलींसोबत दररोज सुमारे ३ किमी अंतरावर असलेल्या वडधा येथील शाळेत पायी पायी जात असत. त्यांचा विवाह ७ जून १९९१ रोजी झाला. प्राथमिक शिक्षक व संतप्रवृती असलेले त्यांचे पती कृष्णकुमार निकोडे हे याच तालुक्यातील पिसेवडधा येथील रहिवासी पण नात्यातीलच होते. त्या काही काळ पतीसोबत नोकरीच्या गावी राहिल्या. तेथेही त्यांनी आपल्या प्रेमळ व सुस्वभावाची छाप पाडली. त्या नेहमी गुणगुणत असत-
“सारी दुनिया का तूही करणधार है।
बिना तेरे ना किस को लगा पार है।।
फिर तो हम को फिकर कौन से बात की।
भूखे मरने की हो या तो खैरात की।
कहता तुकड्या यही मेरा निर्धार है।।”
नंतर त्या प्रियंका व दुर्वांकूर या दोन मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून पतीपासून दूर मध्यवर्ती अशा जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी मुलांसह राहू लागल्या. मुलांना त्यांनी आईबापाचे प्रेम देत वाढविले व सुसंस्कृत केले. स्त्रीपुरुषाची सर्व जबाबदारी त्या एकट्याच पार पाडत असत. पती पंधरा दिवस ते एकेक महिनापर्यंत घरी येत नसतानाही त्यांनी आपला प्रपंच नेटका ठेवला होता.
संत आशाताई आध्यात्मिक विचार प्रवाहाशी सन १९९८ पासून समरस झाल्या. त्यांनी सत्य, एकेश्वरवादी, मानवतावादी असा पवित्र ब्रह्मज्ञान आत्मसात केले होते. ते पवित्र ब्रह्मज्ञान त्यांनी लाखांदूर जिल्हा भंडारा येथील ज्ञानप्रचारक महात्मा संतश्रेष्ठ पांडुरंगजी गुरनूले यांच्या करकमलांद्वारे प्राप्त केले. तेव्हापासून त्यांनी स्वतःला मानव सेवेत झोकून घेतले होते. शेजारीपाजारी, आप्त इष्टमंडळी यांच्याकडे किंवा धार्मिक- आध्यात्मिक सत्संग-संतसमागम अशा ठिकाणी होणाऱ्या सेवाकार्यात त्या स्वखुशीने सहभाग घेत असत. त्यात महाप्रसाद- भोजन स्वयंपाकातील तयारीची कामे, पाणी वाटप, झाडलोट व स्वच्छतेची कामे यात त्यांचा अवश्यच सहभाग असे. त्या सर्वांच्या मदतीला धावून जात, त्यांच्या सुखदुःखात त्या स्वकीयांसारख्या मिसळून जात असत. आपल्या प्रेमळ व मृदू वाणीने त्या इतर अनोळखी व्यक्तींनाही मंत्रमुग्ध करून मैत्री साधत असत. मानवमात्रांच्या सेवाशुश्रूषा कार्यासाठी आपल्या सहकारी भगिनी संत मीराबाई चोपकार यांच्यासोबत सर्वप्रथम नियोजित स्थळी उपस्थित होत असत. त्या तेथील सर्व सेवाकार्ये आटोपून सर्वात शेवटी ते स्थळ सोडत असत. मानवकल्याणाच्या कार्याला त्या प्रथम प्राधान्य देत असत. त्यांनी आपले आईवडील, भाऊबहिणी, जवळच्या नातलगांना तसेच मित्रमंडळींनाही आध्यात्मिक विचार धारेशी जुळवून आणले होते. त्या संत संगतीची महती पटवून देताना म्हणत-
“संतांच्या संगती मिळते मनाला शांती!
येऊनी बसावे या संतांच्या पंगती!!
संत संगत धरा हो आला आहे मोका।”
त्यांच्या माहेरची मंडळी ईश्वरभक्तीत तल्लीन होऊन परमात्म्याचे गुणगान गात सन्मार्गावर चालू लागले. अशाप्रकारे त्या ईश्वरीय ज्ञानाच्या प्रचार, प्रसार व सेवाकार्यातही खऱ्या उतरल्या. दारात आलेल्या याचकांना त्यांनी कधीच रिकाम्या हाताने जाऊ दिले नाही. त्या तहानलेल्यास पाणी, भुकेल्याला अन्न, गरजूंना धन-राशी, वस्त्रप्रावरणे आदी दानधर्म करत असत.
म्हणतात ना,”जो आवडतो सर्वांना, तोचि आवडे देवाला!” या उक्तीप्रमाणे अशा महान संत आशाताई निकोडे यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग जडल्याच्या कारणाने नश्वर देहाचा त्याग केला. त्या दि.६ एप्रिल २०२१ रोजी वयाच्या अवघ्या ४९व्या वर्षी ब्रह्मलीन झाल्या. एका कवीवर्यांनी म्हटलेच आहे-
“अशी पाखरे येती, स्मृती ठेवुनीया जाती!
दोन दिसाची रंगतसंगत, दोन दिसांची नाती!!”
त्यांच्या अल्पवयात निघून जाण्याने गडचिरोली जिल्हा परिसरातील एक खरी सेवाभावी संत हरपल्याची खंत मनात कायम घर करून आहे, हे येथे उल्लेखनीयच!
!! जयंती सप्ताहनिमित्त संतश्रेष्ठ आशाताईंना, त्यांच्या सेवाभावी तथा प्रेमळ स्वभावांना कोटी कोटी दंडवत प्रणाम !!

– संत चरणरज –

श्री एन. के. कुमार, से.नि.अध्यापक.
[संत व लोक साहित्याचे गाढे अभ्यासक.]
द्वारा- श्रीगुरूदेव प्रार्थना मंदिराजवळ, मु. रामनगर, गडचिरोली. जि. गडचिरोली, मोबा. ७७७५०४१०८६.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here