– ब्रम्हपूरी येथे लोकार्पण सोहळा
The गडविश्व
चंद्रपूर : आयसीआयसीआय बँकेच्या सीएसआर निधीतून ब्रम्हपुरी, सिंदेवाही, सावली तालुक्यासाठी चार फिरत्या दवाखान्यांची सेवा उपलब्ध झाली आहे. या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून नागरिकांची मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहे. नागरिकांनी या फिरत्या दवाखान्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत-पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
ब्रम्हपुरी येथे आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज फिरत्या दवाखान्यांचे (मोबाइल क्लिनीक व्हॅन) नुकतेच लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा बॅंकेचे संचालक संदीप गड्डमवार, जिल्हा परिषद सदस्य डॉ. राजेश कांबळे, प्रमोद चिमुरकर, स्मिता पारधी, नगर परिषदेचे गटनेता विलास विखार, नगरसेवक महेश भर्रे, सोनू नाकतोडे, माजी सभापती नेताजी मेश्राम, बंटी श्रीवास्तव, तालुका आरोग्य अधिकारी दुधपचारे आदी उपस्थित होते.
फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून उच्च रक्तदाब, मधुमेह, डेंगी, मलेरिया आदी संसर्गजन्य आजारांची चाचणी करून मोफत औषधोपचार केला जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना याचा नक्कीच फायदा होणार असल्याने नागरिकांनी सुध्दा तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
सदर उपक्रमाचे समन्वयक म्हणून कौस्तुभ बुटाला हे जबाबदारी पार पाडत असून रेव्हमॅक्स टेलिकॉम इन्फ्रास्ट्रकचर प्रा.लि.चे सारंग मोदी, नरेश चौधरी, प्रतिक आचार्य यांचे सहकार्य लाभले.