विश्व युवा कौशल्य दिवस
केंद्र व महाराष्ट्र राज्याच्या राजधानीपासून शेकडो कोस दूर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील मागास व गरीब कुटुंबातील युवावर्गास असले कौशल्य विकास भकासच करणारे ठरत आहे. कारण येथील तरुणाई स्वबळावर किंवा स्वतःचे भांडवल जमवून उद्योग सुरू करू शकत नाही. जरी बँककर्ज काढून किंवा शासनाच्या अनुदानाच्या भरवशावर उद्योग थाटलाही, तरी मात्र त्याची ती दुकानदारी अल्पावधीतच गारद होईल. विचारा तर खरं, का बरं? म्हणून… अहो, येथे त्या योग्य ग्राहकसंख्याच बोटावर मोजण्याइतकी आहे, मग काय माशा मारणार की काय? हीच तर खरी अडचण आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांत कर्मचाऱ्यांच्या रिक्तपदांचा उत्तुंग डोंगर उंचच उंच वाढतच आहे. त्यात भरतीप्रक्रिया राबविल्यास कित्ती बरे होईल, बिच्चारी मागास भागातील सुशिक्षित बेरोजगार तरूणाई पोटापाण्याला लागेल. काही पदांची भरती घेतल्या जाते, मात्र मंत्री, पदाधिकारी व अधिकारी टेबलाखालूनच्या वशिलेबाजीला प्रथम स्थान देतात. त्यातही बिच्चारा हा भुकेकंगाल युवावर्ग मागे पडतो, हीच आजची फार मोठी शोकांतिका! अशी प्रेरक माहिती श्री कृष्णकुमार निकोडे गुरूजींच्या या लेखातून वाचाच.
दरवर्षी साजरा होणारा जागतिक युवा कौशल्य दिन तरुणांना रोजगारासाठी, उद्योजकता बनण्यासाठी प्रोत्साहन देतो. तो तरूणाईच्या अंगी असावे लागणारे कौशल्य सुसज्ज करण्याच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करतो. स्किल इंडिया मिशन देखील याच दिवशी सुरू करण्यात आले आहे. जागतिक युवा कौशल्य दिवस हा तांत्रिक, व्यावसायिक शिक्षण-प्रशिक्षणाचे महत्त्व, स्थानिक आणि जागतिक अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे. या संबंधित कौशल्यासह इतर कौशल्यांच्या विकासाबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस १५ जुलै रोजी साजरा केला जातो. तरुणांना रोजगार, योग्य काम आणि उद्योजकता या कौशल्यांनी सुसज्ज करणे गरजेचे आहे. हा दिवस वर्तमान आणि भविष्यातील जागतिक आव्हाने सोडविण्यासाठी कुशल तरुणांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर देखील प्रकाश टाकतो. हा दिवस तरूणामधील संवाद, तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण-प्रशिक्षण संस्था, कंपन्या, नियोक्ते इत्यादींसाठी एक खास संधी प्रदान करतो. भारतातील स्किल इंडिया मिशन देखील या दिवशी सुरू करण्यात आले आहे. स्किल इंडिया हा केंद्र सरकारचा एक पुढाकार आहे, जो युवा कौशल्याचे सबलीकरण करण्यासाठी व त्यांना अधिक रोजगारक्षम बनवण्यासाठी सुरू केलेला आहे. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना- युनेस्को यांनी जाहीर केलेल्या एका आकडेवारीनुसार जगातील ७० टक्के विद्यार्थी लॉकडाउनमुळे वाईट रीतीने प्रभावित झाले आहेत. अनेक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण सुरु झाल्यामुळे साधनांच्या अभावाने शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. कोविड-१९ या साथीच्या आजारामुळे सद्या ६ पैकी १हून अधिक तरुण कामावर जात नाहीत. अशावेळी जेव्हा तरुणांना रिकव्हरीच्या प्रयत्नास हातभार लावण्याचे आवाहन केले जाते, तेव्हा त्यांना पुढे असलेल्या आव्हानांना यशस्वीरित्या बाजूला करण्यासाठी त्यांना कौशल्यांनी सुसज्ज करणे आवश्यक आहे. जीवघेण्या कोरोना महामारीनंतर युवा कौशल्यावर नवीन विचार करणे गरजेचे आहे.
डिसेंबर २०१४मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने ठराव स्वीकारून १५ जुलै हा जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केला. आजच्या तरूणांसाठी बेरोजगारी आणि रोजगाराच्या आव्हानांच्या बाबतीत अधिक चांगली सामाजिक-आर्थिक परिस्थिती प्राप्त करणे, हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त सन २०२० साली रोटरी क्लब ऑफ बॉम्बेतर्फे प्रशिक्षणार्थींना मोबाईल टॅबलेट वितरणाचा ई-शुभारंभ केला होता. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी जागतिक युवा कौशल्य दिन- वर्ल्ड युथ स्किल्स डे साजरा करण्यात येत असतो. त्यावेळी विविध ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात. सर्वात महत्वाचे म्हणजे दोन वर्षांपूर्वी या दिवसाचे औचित्य साधून सलाम बॉम्बे फाऊंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बेच्या वतीने प्रशिक्षणार्थींना मोबाईल टॅबलेट वितरणाचा ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला होता. त्याचबरोबर स्किल डेव्हलपमेंट फाऊंडेशन यांच्या वतीने ऑनलाईन वेबिनार तसेच कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत फेसबुक आणि युट्यूब लाईव्हद्वारे राज्यभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला होता. कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना विविध कौशल्य प्रशिक्षणे ऑनलाईन साधनांच्या आधारे देण्याचा मानस त्यावेळी कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक साहेब यांनी व्यक्त केला होता. सलाम बॉम्बे फाऊंडेशनमार्फत गरीब विद्यार्थी आणि बेरोजगार तरुणांसाठी ब्युटी आणि वेलनेस, विविध घरगुती उपयोगाच्या वस्तुंची दुरुस्ती, मोबाईल रिपेरिंग, बेकरी उत्पादने, ज्वेलरी डिझाईन, माध्यमे, करमणूक आणि क्रीडाविषयक अशी विविध कौशल्य प्रशिक्षणे दिली जातात. काळवेळ पाहून विद्यार्थ्यांना ही प्रशिक्षणे ऑनलाईन दिली जातात. या प्रशिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल फोन नाही, अशा विद्यार्थ्यांना मदत व्हावी; यासाठी रोटरी क्लब ऑफ बॉम्बेमार्फत विद्यार्थ्यांना टॅबलेट देण्यात येतात. यासोबतच सांगली येथील स्किल डेव्हलपमेंट फाऊंडेशन यांच्यामार्फत राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वेबिनार संपन्न झाला. दुपारी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत झालेल्या फेसबुक आणि युट्यूब लाईव्हमध्ये प्रशिक्षणार्थी व संस्थांचा ऑनलाईन गौरव करण्यात आला होता.
२१ व्या शतकातील तरुणांसाठी बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे. सन २०२०च्या ग्लोबल एम्प्लॉयमेंट ट्रेंड्सच्या अहवालानुसार नोकरी नसलेल्या किंवा प्रशिक्षित नसलेल्या तरुणांची आकडेवारी वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यात एकही तरुण कौशल्य प्रशिक्षणाशिवाय किंवा रोजगाराशिवाय राहणार नाही यासाठी कौशल्य विकास विभाग व्यापक कार्य करेल, असे श्री मलिक म्हणाले. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली आरोग्य कर्मचाऱ्यांची चुगरज लक्षात घेता यासंदर्भातील कौशल्य प्रशिक्षणावर यापुढील काळात अधिक भर देण्यात येईल, असेही मंत्री श्री.मलिक साहेब यांनी त्यावेळी सांगितले होते. शासकीय आयटीआयच्या विद्यार्थ्यांना प्रवेशापासून तर तेथील ट्रेड परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मिळणाऱ्या कर्जापर्यंत विविध सवलती देण्यात येतात. याउलट राज्यातील अशासकीय आयटीआयच्या विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्कापासून उत्तीर्ण होऊनही कोणत्याही सवलती मिळत नाहीत. परिणामी एकाच प्रकारचे प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या दोन गटांत समतोल साधला जाणार कसा? असा सवाल शेवटी उपस्थित होतोच. त्यामुळे सदरील सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा एकसमान विचार करून शासनाने या धोरणावर पुनर्विचार केला पाहिजे, अशी कुजबूज समाजातून ऐकू येत आहे. केंद्र व महाराष्ट्र राज्याच्या राजधानीपासून शेकडो कोस दूर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील मागास व गरीब कुटुंबातील युवावर्गास असले कौशल्य विकास भकासच करणारे ठरत आहे. कारण येथील तरुणाई स्वबळावर किंवा स्वतःचे भांडवल जमवून उद्योग सुरू करू शकत नाही. जरी बँककर्ज काढून किंवा शासनाच्या अनुदानाच्या भरवशावर उद्योग थाटलाही, तरी मात्र त्याची ती दुकानदारी अल्पावधीतच गारद होईल. विचारा तर खरं, का बरं? म्हणून… अहो, येथे त्या योग्य ग्राहकसंख्याच बोटावर मोजण्याइतकी आहे, मग काय माशा मारणार की काय? हीच तर खरी अडचण आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांत कर्मचाऱ्यांच्या रिक्तपदांचा उत्तुंग डोंगर उंचच उंच वाढतच आहे. त्यात भरतीप्रक्रिया राबविल्यास कित्ती बरे होईल, बिच्चारी मागास भागातील सुशिक्षित बेरोजगार तरूणाई पोटापाण्याला लागेल. काही पदांची भरती घेतल्या जाते, मात्र मंत्री, पदाधिकारी व अधिकारी टेबलाखालूनच्या वशिलेबाजीला प्रथम स्थान देतात. त्यातही बिच्चारा हा भुकेकंगाल युवावर्ग मागे पडतो, हीच आजची फार मोठी शोकांतिका!
!! गडविश्व परिवारातर्फे आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाच्या संपूर्ण तरूणाईस हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!
श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी- अलकार.
(समाजिक सुधारणावादी विचारांचे लेखक व कवी)
मु. गडचिरोली, फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.