– आरोपीचा शोध घेण्याचे पोलीसांसमोर मोठे आव्हान
The गडविश्व
चंद्रपूर : जिल्ह्यातील भद्रावती येथे युवतीची हत्या करून मृतदेह निर्वस्त्र मुंडके नसलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना ४ एप्रिल रोजी उघडकीस आली होती. या घटनेमुळे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र मुडके नसल्याने तरुणीची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान स्थानीक गुन्हे शाखेपुढे होते. आता या हत्याकांडातील सदर मृत महिलेची ओळख पटविण्यात तब्बल ४ दिवसांनी स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध पोलीस स्टेशन भद्रावती येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे आहे.
प्राप्त माहितीनुसार, पोलीस स्टेशन भद्रावती हद्दीतील भद्रावती ते तेलवासा रोड मायक्रॉन शाळेमागील शेत शिवारात अज्ञाताने युवतीची हत्या करून ओळख पटू नये या उद्देशाने मुंडके धडावेगडे करून मृतदेह निर्वस्त्र स्थितीत टाकून दिले. सदर घटना ४ एप्रिल रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. मुंडके नसलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने युवतीची ओळख पटविण्यात पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे होते.
पोलीस अधीक्षक अरविंद साळवे व अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेतील सर्व अधिकारी व पथक तसेच सायबर सेल मधील सायबर एक्स्पर्ट यांच्या मार्फतीने महिलेच्या शरीरावरील खुणा, मृतदेहाजवळ मिळालेल्या तिच्या वापराच्या वस्तू इत्यादी शोध पत्रिका तयार करून शोध घेण्यात आला. तसेच चंद्रपूर व बाजूच्या जिल्ह्यातून या वयाच्या हरवलेल्या पळून गेलेल्या मुलींच्या तक्रारीबाबत शहानिशा करण्यात आली परंतु कोणतीही माहिती न मिळाल्याने तसेच घटनेला काही दिवस होऊनही हरवल्याची तक्रार प्राप्त न झाल्याने स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल यांनी तांत्रिक तपास केला व गोपनीय माहिती मिळविण्याचा अहोरात्र प्रयत्न केला. गोपनीय बातमीदाराकडून सदर महिलेची ओळख पटविण्यात आली व तिचा मोबाईल क्रमांक प्राप्त करण्यात आला त्यावरून तिच्या राहते घराचा पत्ता प्राप्त झाला. ती रामटेक जिल्हा नागपूर येथील असल्याचे कळले व तिच्या मोठ्या बहिणीशी संपर्क करून ओळख पाठविण्याची खात्री करण्यात आली. यावेळी तिच्या बहिणीने शरीरावरील वर्ण व वापरातील वस्तू पाहून मृतक ही तिची बहीण असल्याची खात्री केली. व मृतक युवती ओळख पटली.
मृतक युवतीची ओळख पटविण्याची कामगिरी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे व अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सपोनि जितेंद्र बोबडे, सपोनि संदीप कापडे, पोउपनि अतुल कावळे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार व सायबर सेल चे सायबर एक्सपर्ट मुजावर अली, वैभव पत्तीवार, राहुल पोंदे, भास्कर चिंचवलकर, संतोष पानघाटे व उमेश रोडे यांनी केली.
आरोपी आद्यपही फरार
या हत्याकांडातील आरोपीचा शोध अद्यापही लागला नसून त्याचा शोध घेणे स्थानिक गुन्हे शाखा तसेच भद्रावती पोलीस स्टेशन , सायबर सेल चे विविध पथक, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे व अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.