अनंत चतुर्दशी विशेष
_भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते. अनंत चतुर्दर्शीचे व्रत का करतात? हे व्रत आचरण्यामागे विशिष्ट कारण, उद्देश असल्याचे सांगितले जाते. अनंत व्रताचा उद्देश, पद्धती, पूजाविधी, महत्त्व व मान्यता यांविषयी श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी- अलककार यांच्या लेखणीतून जाणून घेऊया… संपादक._
चातुर्मास हा व्रत-वैकल्ये व सण-उत्सवांचा काळ मानला जातो. श्रावण महिन्यात व्रत-वैकल्यांची रेलचेल असते. भाद्रपद महिन्यात हरितालिका पूजन, गणेश चतुर्थी, राधाष्टमी, परिवर्तिनी एकादशी, वामन द्वादशी साजरी केल्यानंतर भाद्रपद चतुर्थीला अनंताचे व्रत करण्याची प्राचीन परंपरा आहे. श्रीविष्णूंना अनंत संबोधले जाते. त्यामुळे या चतुर्दशीला अनंत चतुर्दशी असे म्हटले जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते. हे व्रत आचरण्यामागे विशिष्ट कारण, उद्देश असल्याचे सांगितले जाते. या व्रताचरणात श्रीविष्णूंसह शेषनागाचे पूजन केले जाते. महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. लोकमान्य टिळकांनी एका विशिष्ट उद्देशाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. हा गणेशोत्सव दहा दिवस साजरा करण्याचे ठरवण्यात आले. त्यामुळे दहा दिवसीय गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला केली जाऊ लागली. त्यामुळे अनंत चतुर्दशी स्थितीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. अनंत चतुर्दशीचे व्रत कसे करावे? अनंत व्रताचा उद्देश, पद्धती यांविषयी जरूर जाणून घ्याच.
अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणार नाही तो आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्यरूपी शक्ती होय. भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते. मुख्यतः हे व्रत गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्रीविष्णूंना अनुसरून केले जाते. या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते. कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सापडल्यास हे व्रत करतात, अशी मान्यता आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी हे व्रत आचरावे, असे सांगितले जाते. अनंत व्रत किंवा अनंत चतुर्दशीच्या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजेच श्रीविष्णू असून शेषनाग आणि यमुना या अन्य देवता आहेत. या व्रताचा कालावधी चौदा वर्षांचा आहे. या व्रताचा प्रारंभ कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास करतात आणि मग ते त्या कुळात सुरू होते. अनंताच्या पूजेत चौदा गाठी मारलेल्या तांबडा रेशमाचा दोरा पूजतात. पूजेनंतर दोरा यजमानाच्या उजव्या हातात बांधतात. चतुर्दशी पौर्णिमायुक्त असल्यास विशेष लाभदायक ठरते, असे सांगितले जाते.
चौरंगावर सर्वतोभद्र मंडल काढतात. त्यावर पूर्णपात्र ठेवून अष्टदल काढतात. त्यावर सात फणांचा दर्भाच्या अंकुराने युक्त शेषनाग ठेवून त्याच्यापुढे हळदीने रंगविलेला चौदा गाठींचा दोरा ठेवतात. कुंभाला वस्त्राचे वेष्टन करतात. कुंभातील पाण्याला यमुना मानले जाते. शेष व यमुना यांची पूजा झाल्यावर विष्णूची सोळा उपचारांनी पूजा करतात. अंगपूजा, आवरणपूजा, नामपूजा अशा आणखी अंगभूत पूजांचा यात समावेश केला जाते. पुष्पांजली झाल्यावर अर्घ्य देतात. प्रार्थना करून चौदा गाठींचा दोरा हातावर बांधतात किंवा गळ्यात धारण करतात. वडे आणि घारगे यांचे वाण देतात व व्रत देवतांचे विसर्जन करतात. प्राचीन नागपूजक लोक वैष्णव धर्मात आल्यावर ही पूजा व्रतरूपात आली असावी, असा संकेत मानला जातो. हरियाणात या दिवशी अनंत व्रताचा संकल्प करून पूजा करतात आणि हातात अणत बांधतात.
अनंताचे व्रत करण्याचा दिवस म्हणजे देहातील चेतनास्वरूप क्रियाशक्ती विष्णुरुपी शेषगणाच्या आशीर्वादाने कार्यरत करण्याचा दिवस. या दिवशी विष्णूच्या क्रियाशक्तीरूपी लहरी कार्यमान असतात, असे मानले जाते. शेषदेवता विष्णुतत्त्वाशी संबंधित पृथ्वी, आप आणि तेज या लहरींची उत्तम वाहक मानली जाते; म्हणून शेषाला या विधीत अग्रगण्य स्थान दिलेले आढळते. या दिवशी ब्रह्मांडात कार्यमान असणार्या क्रियाशक्तीच्या लहरी सर्पिलाकार रूपात असल्याने शेषरूपी देवतेच्या पूजाविधानाने या लहरी त्याच रूपात जिवाला मिळणे शक्य होते, असे सांगितले जाते. पुरुषांनी आपल्या उजव्या, तर महिलांनी आपल्या डाव्या हातावर हा दोरा बांधावा, असे सांगितले जाते.
मानवी देहात १४ प्रमुख ग्रंथी असतात. या ग्रंथींचे प्रतीक म्हणून दोर्याला १४ गाठी असतात. विशिष्ट देवतेचे या गाठींवर आवाहन केले जाते. १४ गाठींच्या दोर्याची मंत्रांच्या साहाय्याने प्रतीकात्मक रूपात पूजा करतात. यामुळे चेतनेच्या प्रवाहाला गती मिळून देहाचे कार्यबल वाढण्यास साहाय्य मिळते. त्यानंतर पुन्हा पुढील वर्षी जुने दोरे विसर्जित करून क्रियाशक्तीने प्रभारीत नवीन दोरे बांधले जातात. तसेच १४ गाठी या श्रीविष्णूंनी निर्माण केलेल्या १४ लोकांचे प्रतीक मानल्या जातात. द्युत क्रीडेत गमावलेले सर्व वैभव परत मिळण्यासाठी युद्धिष्ठिरासह पांडवांनी अनंत व्रताचे आचरण केले होते. श्रीकृष्णाने पांडवांना या व्रताचे महत्त्व सांगितले होते. त्या व्रतप्रभावाने पांडवांना त्याचे गेलेले राज्य परत मिळाले. गतवैभव प्राप्त झाले, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
!! The गडविश्व न्युज परिवारातर्फे अनंत चतुर्दशीच्या सर्व बंधुभगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!
श्री एन. कृष्णकुमार, से.नि.अध्यापक.
रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली.
फक्त व्हॉटसॅप नं. ९४२३७१४८८३.