पहाटेच्या अंधुक प्रकाशात पाय मोकळे करावे म्हणून मी फिरायला निघाले. गार हवा, पक्ष्यांचा चिवचिवाट, फुलांनी बहरलेली झाडे या सगळ्यांनी मन अगदी प्रसन्न झाले. परत येतांना वाटेत रस्त्याच्या कडेला पांढऱ्या शुभ्र रंगाचे, बारीक डोळ्यांचे आणि मोठ्या कानाचे, गोंडस कुत्र्याचे पिल्लू दिसले. बघताच क्षणी कुणालाही आवडणार असे त्याचे रूप पण लहानपणापासून कुत्र्या विषयी भीती असल्यामुळे मी त्याला बघून त्याच्या लांबूनच घरी आले. घरी येऊन उत्साहपोटी आईला विचारले, अगं आई आपल्या शेजारी कुणी कुत्र्याचे पिल्लू आणले काय?”
” समोरच्या कॉर्नर ला असलेल्या देठे काकूंकडे आणले आहे” असे आईने सांगितले. त्यांचे घर आमच्या घरापासून जरा लांबच होते. मग नियमित ऑफिसला येता जातांना मला ते कुत्र्याचे पिल्लू दिसायचे. काही दिवसांनी मला ते कुत्र्याचे पिल्लू उघड्यावर भटकतांना दिसू लागले. मनात असणारी कुत्र्या विषयी भीती आणि कामाच्या व्यापामुळे मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले.
एका रात्री कुई कुई असा आवाज मोठ्याने येऊ लागला. मी उठून बाहेर बघितले पण मला काही दिसले नाही. शेवटी सकाळी जाग आल्यावर बाहेर बघीतले तर थंडीने कुडकुडत व कण्हत असलेले कुत्र्याचे पिल्लू झाडाच्या आडोशाला निजले होते. त्याच्या अंगाला खाज सुटली होती आणि त्याने स्वतःला खाजवुन रक्तबंबाळ केले होते. तर दुसऱ्या बाजूला आमच्या शेजारी राहणारा चिक्कू वय वर्ष बारा प्राण्यांवर प्रेम करणारा अतिशय गोड मुलगा तो कुत्र्याच्या पिल्लासाठी खरड्यापासून सुंदर घर तयार करत होता. मला ते सगळं बघून काय झाले ते कळत नव्हते म्हणून मी आजूबाजूला चौकशी केली तर कळले त्या देठे काकूच्या आजोळी गेलेल्या मुलांनी गावावरून सात आठ दिवसाच्या कुत्र्याचा पिल्लाला त्याच्या आईपासून दुरावून इथे घरी पाळायला आणले. पण काही दिवसातच कंटाळले. ते त्याच्याकडे लक्ष देत नसत. त्याला खायला प्यायला देत नसत. अशातच त्याला खाज झाली आणि त्यांनी त्याला रस्त्यावर सोडून दिले. ते पिल्लू रोज त्यांच्या दारापुढे जाऊन बसत असे पण ती लोक त्याला काठीने मारून हाकलून लावीत. एवढ्यात काल रात्री खूप थंडी पडली म्हणून ते कुत्र्याचे पिल्लू थंडीने कुडकुडत कण्हत कुई कुई रडायला लागले.मी हे सगळं ऐकून अवाक झाले. तोपर्यंत चिक्कूने खरड्याचे छान से दुमदार घर तयार केले त्यात उबदार कापडं ठेवलीत. त्या कुत्र्याच्या पिल्लाला पाइपाच्या साह्याने आंघोळ घालून दिली. त्याला दूध भात खायला दिले. त्याचे नाव टॉमी ठेवण्यात आले. त्यानंतर मी पण घरी येऊन माझ्या वन्यजीवप्रेमी असणाऱ्या मित्राच्या सहाय्याने पशुचिकित्सकांना संपर्क साधला. त्यांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शन नुसार गोळ्या घेतल्या. त्या गोळ्या टॉमीला नियमित देण्याची जबाबदारी चिक्कूने घेतली. चिक्कूने घेतलेल्या काळजी आणि सेवेमुळे टॉमी आता बरा होऊ लागला आहे. आमची सगळ्यांना कडकडून विनंती आहे की तुमच्या ने काळजी घेणं होत नसेल तर कृपया मुक्या जीवांना पाळू नका. माणसांपेक्षा प्राणी जास्त जीव लावतात. मुके जनावर असली तरी ७-८ दिवसांच्या पिल्लाला त्याच्या आई पासून दुरावने हे पाप नाही तर काय? तुम्ही चांगल्या रित्या त्याचा सांभाळ करू शकत असाल तरच त्यांना पाळा. चिक्कू सारख्या छोट्या मुलाला जे कळले ते मोठ्या शिक्षित लोकांना का कळू नये? कुणाला प्रेम देऊ शकत नसाल तर त्यांना वेदना ही देऊ नका…
स्वाधिनता बाळेकरमकर