The गडविश्व
गडचिरोली, ५ नोव्हेंबर : तालुक्यातील माडेमूल येथील विक्रेत्याच्या घरावर धाड टाकून ४ हजार रुपये किंमतीची २० लिटर मोहफुलाची दारू जप्त केल्याची कारवाई गडचिरोली पोलिस व मुक्तीपथने संयुक्तरित्या केली. याप्रकरणी विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माडेमूल गावात ५ दारूविक्रेते सक्रिय असून जिल्हा मुख्यालयासह परिसरातील इतर गावातील किरकोळ विक्रेत्यांना दारूचा पुरवठा करतात. दरम्यान, एका घरातून अवैध दारूची विक्री होत असल्याची माहिती प्राप्त झाली.मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस व मुक्तीपथ तालुका चमूने निलेश मोहूर्ले नामक विक्रेत्याच्या घरावर धाड टाकली. यावेळी विक्रेत्याच्या घराची तपासणी केली असता, ४ हजार रुपये किंमतीची २० लिटर मोहफुलाची दारू आढळून आली. पोलिसांनी संपूर्ण माल जप्त करीत संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस हवालदार शिवदास दुर्गे, मुक्तीपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांनी केली. या गावातील इतरही दारूविक्रेत्यांवर कारवाई करून दारूमुक्त गाव निर्माण करण्याची मागणी गाव संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.