– अतिदुर्गम कुचेर गावात मॅरेथॉन
The गडविश्व
भामरागड, २६ सप्टेंबर : तालुक्यातील अतिदुर्गम कुचेर गावात गाव संघटनेच्या सहकार्याने ‘मुक्तिपथ मॅरेथॉन’ दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या गावातील आदिवासी युवक, युवती, महिला व पुरुषांनी ‘मावा नाटे व्यसनमुक्त नाटे’ अशी घोषणाबाजी करत स्पर्धेत सहभाग दर्शविला. झारेगुडा येथेही पार पडलेल्या स्पर्धेत गावातील २७ स्पर्धकांनी धाव धरली.
‘दारू व तंबाखू मुक्तीसाठी धावूया’ ही या मॅरेथॉन स्पर्धेची मुख्य थीम आहे. स्पर्धेच्या माध्यमातून गावाच्या दारू व तंबाखूमुक्तीसाठी गावातील सक्रीय युवक, महिला व पुरुष यांनी एकत्र यावे. संघटना बनवून पुढे कृती करावी, या उद्देशाने मुक्तिपथ द्वारा गावातील संघटन सदस्याच्या सहकार्याने गावोगावी स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या कुचेर गावात आयोजित मॅरेथॉनची सुरुवात गाव पाटील सत्तु हेडो, भूमिया लेबडू हेडो, पेसा अध्यक्ष कन्न हेडो यांच्याहस्ते दारूमुक्तीची मशाल पेटवून करण्यात आली. सोबतच गावात प्रभातफेरी काढून जनजागृती करण्यात आली. यावेळी गाव पाटील सत्तु हेडो यांनी ग्रामस्थांना दारू व खर्राच्या दुष्परिणामबाबत मार्गदर्शन केले. ग्रामस्थांनी गाव व्यसनमुक्त करण्याचा संकल्प घेतला. दरम्यान पार पडलेल्या स्पर्धेत विजय संपादन केलेल्या स्पर्धकांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
झारेगुडा येथील मॅरेथॉन स्पर्धेत 27 महिला, युवती, युवक व पुरुष खेळाडूंनी उत्साहपूर्वक सहभाग घेतला. यावेळी गावसंघटन अध्यक्ष रमेश पुंगाटी, दीपक मडावी, गावातील ज्येष्ठ नागरिक दस्स वेळदा आणि शिक्षक कुडयामी यांच्या उपस्थितीत मशाल पेटवून स्पर्धा घेण्यात आली. चारही गटातून विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. दोन्ही कार्यक्रमांचे नियोजन मुक्तीपथ कार्यकर्ता आबिद शेख व विद्या पुंगाटी यांनी केले.