The गडविश्व
गडचिरोली : आपल्या गावाला दारूमुक्त ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असलेल्या अहेरी तालुक्यातील मेडपल्ली गाव संघटनेच्या सक्रिय सदस्यांना मूक्तीपथ तर्फे एक नवी ओळख मिळाली आहे. या सदस्यांना बिल्ले वाटप करीत पुढील कार्यास प्रोत्साहन देण्यात आले.
मेडपल्ली हे गाव तीन वर्षांपासून दारूमुक्त गाव आहे. मात्र, मागील दोन महिन्यांपूर्वी गावात चोरट्या मार्गाने अवैध दारूविक्री सुरु असल्याचे कळताच ग्रा.पं. सरपंच निलेश वेलादी व पेसा अध्यक्ष भगवान मडावी यांच्या पुढाकारातून ग्रामसभेचे आयोजन करून गाव कायम दारूमुक्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. गावात विक्री करणाऱ्यांवर १५ हजारांचा व पिणाऱ्यांवर ५०० रुपयांचा दंड आकारणे. विक्रेत्यास पकडून देणाऱ्यास १ हजार रुपये बक्षीस सुद्धा देण्याचा ठराव घेण्यात आला. यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आला आहे. गावात या निर्णयांची अंमलबजावणी सुरु असून सध्या गाव दारूमुक्त आहे.
या गाव संघटनेच्या कार्याचे कौतुक करीत गाव संघटनेचे सक्रिय अध्यक्ष, सचिव व सदस्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मुक्तिपथ अभियानाचे उपसंचालक संतोष सावळकर यांनी सदस्यांची भेट देऊन ‘एक सक्रिय सदस्य’ म्हणून बिल्ले दिले. तसेच मुक्तिपथ तालुका संघटक केशव चव्हाण यांनी बिल्ल्याचे महत्व, अटी व कधी व कोठे वापर करायचा याबद्दल सदस्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी तालुका प्रेरक आनंद कुम्मरी यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.