– येडानूर येथे ‘मुक्तिपथ मॅरेथॉन’ दौड स्पर्धा
The गडविश्व
गडचिरोली, २९ सप्टेंबर : चामोर्शी तालुक्यातील येडानूर गावात गाव संघटनेच्या सहकार्याने ‘मुक्तिपथ मॅरेथॉन’ दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या गावातील युवक, युवती, महिला व पुरुष अशा एकूण २५० जणांनी स्पर्धेतून दारूमुक्तीसाठी धाव धरली.
‘दारू व तंबाखू मुक्तीसाठी धावूया’ ही या मॅरेथॉन स्पर्धेची मुख्य थीम आहे. स्पर्धेच्या माध्यमातून गावाच्या दारू व तंबाखूमुक्तीसाठी गावातील सक्रीय युवक, महिला व पुरुष यांनी एकत्र यावे. संघटना बनवून पुढे कृती करावी, या उद्देशाने मुक्तिपथ द्वारा गावातील संघटन सदस्याच्या सहकार्याने गावोगावी स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.येडानूर येथे सरपंच रजनी पांडुरंग उसेंडी ,पोलीस पाटील बालाजी पोटावी, आशा मनोहर मडावी, गाव संघटनेचे सदस्य व गावकऱ्यांच्या उपस्थितीत दारूमुक्तीची मशाल पेटवून स्पर्धेची सुरवात करण्यात आली. या स्पर्धेमध्ये गावातील महिला १२०, पुरुष ५० व युवक-युवती अशा एकूण २५० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. त्यानंतर बैठकीचे आयोजन करून तालुका संघटक आनंद इंगळे यांनी ग्रामस्थांना दारू व खर्राच्या दुष्परिणामबाबत मार्गदर्शन केले. ग्रामस्थांनी गाव व्यसनमुक्त करण्याचा संकल्प घेतला. दरम्यान पार पडलेल्या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकवणाऱ्या स्पर्धकाला मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.