– मुक्तिपथ तर्फे देलनवाडी येथे उपक्रम
The गडविश्व
गडचिरोली, २३ सप्टेंबर : आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथे गाव समिती व मुक्तिपथच्या संयुक्त विद्यमाने ‘मुक्तिपथ मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. “दारू व तंबाखू पासून मुक्तीसाठी धावूया ही या स्पर्धेची मुख्य थीम असून स्पर्धेच्या माध्यमातून गावाच्या दारू व तंबाखू विक्री मुक्तीसाठी गावातील सक्रीय युवक, महिला व पुरुष यांनी एकत्र यावे. संघटना बनवून पुढे कृती करावी व गाव दारू विक्री मुक्त करावे हा कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. याच उद्देशाने मुक्तिपथ द्वारा गावातील संघटन सदस्याच्या सहकार्याने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महिला, युवक, युवती व पुरुष असे मिळून एकूण ५२ जणांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.
दरम्यान, स्पर्धेनंतर ग्रामपंचायत सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मुक्तिपथचे कार्य, उद्देश स्पष्ट करण्यात आले. सोबतच गावाला दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी युवक, युवती, महिला व पुरुषांनी पुढाकार घ्यावा. तसेच मुक्तिपथ सोबत जुळून काम करण्याचे आवाहन देसाईगंजचे तालुका संघटिका भारती उपाध्ये यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन आरमोरी तालुका कार्यकर्ते विनोद कोहपरे, देसाईगंजचे उपसंघटक अनुप नंदगिरवार, पल्लवी मेश्राम व सुषमा वासनिक यांनी केले. सदर स्पर्धा बघण्यासाठी गावातील महिला, बाल गोपाल यांनी मोठ्या संख्येत उपस्थिती दर्शवली व इतर गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.