– मॅजिकमध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा
The गडविश्व
भिसी/ चिमूर, ९ ऑगस्ट: आजच्या आधुनिक युगामध्ये मोठी स्पर्धा असून इतरांशी स्पर्धा न करता स्वतःची स्पर्धा करावी लागते, यशस्वी व्हायचे असेल तर कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. फक्त आपल्या आदिवासी जमातीतील विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा न करता खुल्या गटासोबत स्पर्धा करत परीक्षा उत्तीर्ण कराव्यात, असा मूलमंत्र शंकरपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद जांभळे यांनी मॅजिक विद्यार्थ्यांना दिला. आज ९ ऑगस्ट २०२२ रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त डॉ. रमेश कुमार गजबे शिक्षा संकुल येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सौ. रुपाली जांभळे, ब्राईटएज फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत एकुडे , साहस उपक्रमाचे संयोजक विलास चौधरी उपस्थित होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद जांभळे स्वतःच्या स्पर्धा परीक्षा प्रवासाविषयी बोलत असताना त्यांनी बदललेल्या परीक्षा पद्धतीवर प्रकाश टाकला. तसेच क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांनी ज्या पद्धतीने अगदी कमी वयात इंग्रजांसोबत अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या कुटुंबाची व समाजाची परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल. समाजाने समाजासाठी आणि समाजामार्फत चालवलेल्या मॅजिक उपक्रमाचे कौतुक करत या उपक्रमाचा लाभ घेतलेल्या व यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी समाजाचे ऋण फेडण्यासाठी परिपूर्ण मदत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि स्वतः मॅजिकला आर्थिक मदत सुद्धा केली तसेच पुस्तकांसाठी पुरेपूर मदत करण्याची ग्वाही सुद्धा त्यांनी यावेळी दिली. या छोटेखाणी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील शेरकुरे तर आभार प्रदीप श्रीरामे यांनी मानले.