The गडविश्व
सावली : मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व तालुका निरीक्षक निकिता ठेंगणे यांच्या नेतृत्वात मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपुर संस्थेच्या वतीने मूल तालुक्यात “SCALE” कार्यक्रमा अंतर्गत १२ ते १६ वर्षे वयोगटातील ७००३ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी “खेळाद्वारे शिक्षण/जीवन कौशल्य विकास” हा कार्यक्रम मागील वर्षा पासून सातत्याने राबविला जात आहे.
त्याच अनुषंगाने ०८ ते १० मार्च २०२२ या कालावधीत जागतिक महिला दिना निमित्य मूल तालुक्यातील राजोली, डोंगरगाव, चिखली, मोरवाही, टेकाडी, चीमढा, नांदगाव, बोंडाळा बुज., बाबराळा, बेंबाळ, गडीसूर्ला, सुशी, सिंथळा, दाबगाव इत्यादी गावांमध्ये महिला दिनाच्या निमित्याने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्त्री हा कुटुंबाचा कणा असते आणि उद्याचे भविष्य घडविण्याच्या कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. त्यामुळे स्त्रियांना हक्काचे व्यासपीठ लाभावे जेणेकरून त्या आपल्या अंगी असलेली कलागुण सादर करतील. अशा हेतूने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, ज्या मध्ये संपूर्ण तालुक्यातील अधिकाधिक महिलांचा सहभाग होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील सरपंच उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गावातील उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स,शाळेतील शिक्षक वृंद,ग्रामसंघातील महिला व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे फलस्वरूप असे की कार्यक्रमात बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या, महिलांना खेळाच्या माध्यमातून आपले कलाकौशल्य सादर करण्यासाठी संधी उपलब्ध झाली, सोबतच शिक्षणाचे महत्व लक्षात आले.
सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळा साहाय्यक अधिकारी संदेश रामटेके,दिनेश कामतवार,शुभांगी रामगोनवार व मॅजिक बस संस्थेचे समुदाय समन्वययक यांनी प्रयत्न केले.