– वन्यजीवप्रेमी तथा मानव – वन्यजी संघर्ष समन्वय समिती सदस्य अजय कुकडकर यांचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली : ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसात मोहफुल संकलन हंगाम सुरु झाला आहे. मात्र, जंगल परिसरात वन्यप्राण्यांचा वावर असल्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे मोहफूल संकलन करतांना योग्य दक्षता घेण्याचे आवाहन वन्यजीवप्रेमी अजय कुकुडकर यांनी केले आहे.
मोहफुल व तेंदूपत्ता जास्त मिळावा, यासाठी ग्रामीण भागातील नागरिक पहाटेच्या अंधारातच जंगलात जातात. अशावेळी जंगल परिसरात योग्य ती काळजी न घेतल्यास जीविताचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मोहफुल व तेंदूपत्ता संकलन करतांना आजू बाजूला लक्ष ठेवावे. शक्य तो जास्त वेळ खाली वाकून मोहफुल गोळा करू नये, एकाने जमा करावे व दुसऱ्यांनी आजू बाजूला लक्ष ठेवावे. एकट्याने जंगलात जाऊ नये. तीन चारच्या गटाने आवाज करीत जावे. जंगलात चौफेर नजर असावी. स्त्रीने पुरुषाच्या सोबतीने जावे. वाघ काय करतो, मेलो तर घरच्यांना १५ लाख मिळतात असा विचार करू नये. म्हातारे व कमजोर व्यक्तीने जंगलात जाणे टाळावे. वाघ जंगलात दिसल्यास सर्वानी आरडाओरड करावे व तिथून निघून जावे. मलाच मोफफुले व तेंदूपत्ता मिळाले पाहिजेत म्हणून एकट्याने जंगलात सैरावैरा भटकू नये. तेंदूपत्ता झुडुपात असेल तर सावध होऊनच त्या जवळ जावे. पाणवठ्या तलावाच्या जवळपास सावधगिरीने जावे, त्याठिकाणी तिथे वाघ असण्याची शक्यता असते.
तेंदुपता, मोहफूल गोळा करण्याकरिता दिवस उजळल्यानंतरच जावे व दुपार होण्यापूर्वी परत यावे. कोणत्याही वन्यप्राण्याला इजा करू नये, वन्यप्राणी चौताळून इतर लोकांवर हल्ला करू शकते, जंगलात आग लावू नये त्याने वन्यप्राण्यांचे घर जळते व ते सैरावैरा पळून शेताकडे-गावाकडे येतात. झाडे तोडणे, झाडावर चढणे टाळावे. मोहाच्या झाडाखालची जागा स्वच्छ करून घ्यावी पण आग लावू नये. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे व वनविभागाला सहकार्य करावे, असे आवाहन वन्यजीवप्रेमी तथा
मानव – वन्यजीव संघर्ष समन्वय समितीचे सदस्य अजय कुकडकर यांनी केले आहे.