मौल्यवान रानभाज्यांचे जतन व संवर्धन आवश्यक : वनसंरक्षक, डॉ.मानकर

506

– कृषि रानभाज्या महोत्सवाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांच्याहस्ते उद्घाटन
The गडविश्व
गडचिरोली, ६ ऑगस्ट : पौष्टिक आणि औषधींनी गुणसंपन्न अशा मौल्यवान रानभाज्यांचे जतन व संवर्धन आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपल्याला केले पाहिजे असे प्रतिपादन गडचिरोलीचे वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर यांनी केले.
वन विभाग कार्यालय परिसरात स्वातंत्र्याच्या आमृत महोत्सवानिमित्त वन, कृषि, आत्मा, कृषि विज्ञान केंद्र, माविम, नाबार्ड व उमेद या विभागांनी संयुक्तिक कृषि रानभाज्या महोत्सवाचे आयोजन ५ ते ७ ऑगस्ट दरम्यान केले आहे. याचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी अध्यक्षीय भाषणात वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर आपले विचार मांडत होते. गडचिरोली जिल्हयात ७८ टक्के वन संपदेचे पालकत्व वन विभागाकडे आहे, यावर गडचिरोली मधील अर्थिक चक्र मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. रानभाज्यांची माहिती जसजसे शहराकडे येवू तसतसे लोकांना माहिती नाहीत. रानभाज्या या आपल्या पुर्वजांच्या दैनंदिन अन्न प्रक्रियेतील प्रमुख घटक असायचा. आता माहिती अभावी त्या लोप पावत आहेत. रानभाज्यांचे गुणधर्म व महत्त्व आता सर्वदूर पोहचविणे प्रशासनाचे कर्तव्य आहे असे ते यावेळी म्हणाले. कृषि विज्ञान केंद्र गडचिरोली मार्फत रानभाज्यांवरती आधारीत पुस्तिकेची निर्मिती केली आहे. त्याचे प्रकाशान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाला वनसंरक्षक, कुलगुरू यांचे समवेत डॉ.डी.बी.उंदिरवाडे, संचालक, विस्तार शिक्षण, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज मस्तोळी, प्रकल्प संचालक आत्मा संदीप क-हाळे, तहसिलदार गडचिरोली महेंद्र गणवीर, भावसे मधील जमीर शेख, हरवीर सिंग, धनंजय वायभिसे तसेच जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी भुयार सर, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी फुलझेले, मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे आदी मान्यवर उपस्थित होते.
गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी रानभाज्यांचे आजच्या युगातील महत्त्व विशद करून महागड्या फास्टफुडपेक्षा स्वस्त व पौष्टिक रानभाज्यांचा अंगिकार करण्याचे आवाहन उपसिथतांना केले. राभाज्यांचा व्यावसायिक दृष्टया विचार केल्यास मार्केटींग आणि पुरवठा यामध्ये हजारोंमधे रोजगार निर्मिती होवू शकते असे ते म्हणाले. गोंडवाना विद्यापीठात आदिवासी, हस्तकला आणि त्यांची संस्कृती याबाबत अभ्यासक्रम सुरू आहेत. यातच आता अशा नव्या विषयांची जोडही देता येईल. रानभाज्यांना समोर ठेवून अनेक उद्योग सुरू करता येतील असे ते यावेळी म्हणाले. डॉ. डी.बी.उंदिरवाडे, संचालक यांनी कृषि विज्ञान केंद्राने तयार केलेल्या रानभाज्या पुस्तिकेचे कौतुक केले व अशा स्वरूपात पारंपरागत रानभाज्यांच्या माहितीचे जतन होईल असे मत व्यक्त केले. यावेळी बसवराज मस्तोळी यांनी राभाज्यांचे महत्व सांगितले. तसेच मिलीश शर्मा, महेंद्र गणवीर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रास्ताविक संदीप क-हाळे यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर ताथोड यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके, वनपरीक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम, वसंत मेडेवार, अविनाश भडांगे, राहुल तांबरे, विजय कोडापे, सामाजिक वानिकरणचे धिरज ढेंबरे व कृषी विज्ञान केंद्राचे लाकडे यांनी विशेष प्रयत्न केले.

तीन दिवस ६० प्रकारच्या रानभाज्यांचा घेता येणार आस्वाद

गडचिरोली येथे वन विभागाच्या कार्यालय परिसरात शिल्पग्राम प्रकल्प येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून ५ पासून ७ ऑगस्ट पर्यंत सकाळी ११ ते ५ वा पर्यंत वेगवेगळया तब्बल ६० प्रकारच्या रानभाज्या नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. या ठिकाणी रानभाज्यांची माहिती, विक्री व पदार्थ विक्रीसाठी आहेत. या ठिकाणी सहकुटुंब सुट्टीच्या दिवशी येवून पारंपारिक वनसंपदेचा ठेवा लोकांनी चाखावा असे आवाहन मुख्य वनसंरक्षक यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here