– वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने घेतला निर्णय
THE गडविश्व
पटणा : बिहारमध्ये वाढत्या कोरोना रूग्णसंख्येमुळे राज्य सरकारने राज्यात रात्रीचा कर्फ्यू (Night Curfew In Bihar) आणि भाविकांसाठी मंदिरे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय सिनेमा हॉल, जिम, पार्क, क्लब, स्टेडियम आणि स्विमिंग पूल पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. नवीन आदेशानुसार बिहारमध्ये रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
रेस्टॉरंट, ढाबे केवळ 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, विवाह सोहळ्याला जास्तीत जास्त 50 व्यक्ती आणि अंत्यसंस्काराला जास्तीत जास्त 20 व्यक्तींना उपस्थिती लावता येणार आहे. सर्व राजकीय, सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त 50 लोकांना परवानगी देण्यासोबतच इयत्ता 9 ते12 चे वर्ग आणि महाविद्यालये 50 टक्के उपस्थितीसह सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर प्राथमिक ते आठवीपर्यंतचे सर्व वर्ग ऑनलाइन चालविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याशिवाय सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालये 50% उपस्थितीने कार्यरत राहणार (Corona Cases In Bihar) आहेत. राजधानी पटणामध्ये सर्वाधिक 565 रूग्ण नोंदवली गेली आहेत. दरम्यान, नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी सामाजिक सुधारणा अभियान दौरा आणि त्यांचा साप्ताहिक जनता दरबार कार्यक्रम 21 जानेवारीपर्यंत पुढे ढकलल्याचीही माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. देशातील वाढत्या रूग्णसंख्येमुळे देशातील इतर राज्यांमध्येदेखील करोना निर्बंध कडक करण्यात आले असून राजधानी दिल्लीत विकेंड लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
