युवकांनी याच वयात स्वच्छंद जगावे : जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ

118

– युवा महोत्सवाचे यशस्वी आयोजन
The गडविश्व
गडचिरोली, २८ सप्टेंबर : युवकांनी तारूण्यात ज्ञान अर्जनासह आवडेल ते छंद जोपासून आयुष्य स्वछंद जगावे असे प्रतिपादन नेहरू युवा केंद्राने (neharu yuva kendr) आयोजित केलेल्या युवा महोत्सवात जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ (sachin Adsul) यांनी केले. आजच्या सोशल मिडीयाच्या जगात युवक स्वत:ला बांधून ठेवत आहे. माहिती, ज्ञान, आचार व विचार आत्मसात करून चांगल्या प्रकारे आवडीने कला, क्रीडा क्षेत्रात सहभाग घ्यावा. तारूण्यात युवकांना चांगला मार्ग निवडता आला पाहिजे, चुकीचे, अवैचारिक सामाजिक विरोध युवकांना आयुष्यातील जगण्याचा मार्ग अवघड करून देतात. त्यामुळे या वयात माहिती नसेल तर सामाजिक किंवा इतर महत्वाच्या प्रश्नांवर प्रतिक्रिया न देता फक्त अभ्यास म्हणून माहिती घ्यावी. वैचारीक परिपक्वता ही विशिष्ट कालावधीनंतर येत असते. आताच युवकांनी अशा विषयात न पडता आपल्या भविष्याचा विचार करून मनमोकळेपणाने वर्तमानात जगावे असे मत सचिन अडसूळ यांनी व्यक्त केले. नेहरू युवा केंद्र गडचिरोली, राष्ट्रीय सेवा योजना गोंडवाना विद्यापीठ (gondwana university) व स्काऊट गाईड यांनी एकत्रित महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संचालक एनएसएस डॉ. श्याम खंडारे, उद्घाटक जिल्हा क्रीडा अधिकारी दोंदल, जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे, प्रा.शांती पाटील, विवेक कहाळे, मनोहर हेपट, डॉ.शुभांगी परशूरामकर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ.श्याम खंडारे यांनी युवकांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व जिल्हा क्रिडा अधिकारी यांनी युवकांनी विविध स्पर्धांमधे सहभाग घेण्यासाठी आवाहन केले. ते म्हणाले, गडचिरोली जिल्हयाच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात क्रीडा कौशल्य आहे. आपल्याकडे विविध खेळांसाठी प्रशिक्षणे, शिबीरे आयोजित केली जातात. यामधे सहभाग घेणे आवश्यक आहे. यावेळी प्रास्ताविक भाषणात नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांनी युवा महोत्सवाबाबत उपस्थितांना माहिती दिली. चित्रकला, कविता स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा, भाषण, सामुहिक सांस्कृतिक कार्यक्रम व युवा संवाद अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामधे विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देण्यात येणार आहे.

गडचिरोली जिल्हयात प्रथमच युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. संपुर्ण देशासह राज्यात प्रत्येक जिल्हयात एकाच दिवशी महोत्सव घेण्यात आला. यावेळी विविध विद्यालयातील स्पर्धक व युवकांनी सहभाग नोंदविला. युवकांचा सार्वजनिक कार्यक्रमांतील सहभाग वाढविणे व त्यांच्या कलागुणांना मंच तयार करून देण्यासाठी दरवर्षी युवा महोत्सवाचे आयोजन युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय, भारत सरकार करीत असते. कृषि महाविद्यालय गडचिरोली येथे झालेल्या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चेतन ठाकरे यांनी केले. विविध स्पर्धांसाठी परिक्षक म्हणून मनोहर हेपट, पुनीत मातकर, डॉ.संदिप लांजेवार, डॉ.पवन नाईक यांनी काम पाहिले. युवा संवादामधे युवकांना मार्गदर्शन व त्यांचेशी संवाद साधण्यासाठी अमृत बंग व कविता मोहरकर यांनी योगदान दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here