-नागपूरसह अमरावती, वर्धा, चंद्रपूर, अकोला आणि वाशिम या सहा जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट
The गडविश्व
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानाचा पारा वाढला आहे. तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने राज्यातील नागरिक हैराण झाले आहेत. येत्या काही दिवसांत राज्यातील विविध भागात तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर येत्या ४८ तासात विदर्भातील अनेक भागात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी महत्त्वाच्या कामाशिवाय दुपारच्या वेळेस घराबाहेर पडू नये, असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
तसेच तापमानात अचानक वाढ झाल्याने नागरिकांना उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दिवसभरात भरपूर पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. खरंतर, सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे क्षेत्र पुढील काही काळात ईशान्य आणि मध्य भारताच्या दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे. तसेच येत्या काही दिवसात हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून उष्णतेत वाढ होणार आहे.
राज्यात वाढत्या तापमानाची झळ ही सर्वाधिक विदर्भ, खानदेशाला बसणार आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेने ४० अंशाचा पारा ओलांडला आहे. या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान खात्याने आज नागपूरसह अमरावती, वर्धा, चंद्रपूर, अकोला आणि वाशिम या सहा जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट दिला आहे. आज दिवसभर याठिकाणी कमाल तापमानाचा पारा चढा राहणार आहे. उद्या नागपूर वगळता विदर्भात उष्ण हवामानाची हीच स्थिती कायम राहणार आहे.
2. Heat Wave conditions very likely to prevail in isolated to some parts of Rajasthan, West Madhya Pradesh and Vidarbha during next 48 hours; over Gujarat state, Telangana during next 24 hours.
— India Meteorological Department (@Indiametdept) March 18, 2022