The गडविश्व
नवी दिल्ली : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे काल निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर विविध स्तरातून, देश विदेशातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोठी घोषणा केली आहे. इंदूरमध्ये दिवंगत लता मंगेशकर यांच्या नावाने संगीत अकादमीची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच एक संग्रहालयही बांधले जाईल, अशी माहिती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे.
लता मंगेशकर यांनी जी गणी गायली आहेत, ती गाणी संग्रहालयात उपलब्ध असणार आहेत. तसेच इंदूरमध्येच त्यांचा पुतळा बसवला जाणार आहे. दरवर्षी त्यांच्या जयंतीदिवशी लता मंगेशकर पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे. दरम्यान, चौहान यांनी आज स्मार्ट उद्यान भोपाळ येथे लता मंगेशकर यांना आदरांजली वाहिली. तसेच संगीतप्रेमींसोबत त्यांच्या हस्ते लतादीदींच्या स्मरणार्थ वृक्षारोपण देखील करण्यात आले. यावेळी चौहान म्हणाले की, लतादीदींच्या जाण्याने माझ्या मनात पोकळी निर्माण झाली आहे, जी भरून काढता येणार नाही.