The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज , ५ नोव्हेंबर : धान पीक हे वडसा तालुक्यातील मुख्य पीक आहे. मात्र, काळाच्या ओघात आता येथील शेतकरीही पीक पध्दतीमध्ये बदल करीत आहे. रब्बी हंगामातील मका हा धान पिकाला सक्षम पर्याय उभा राहत असून गेल्या दोन वर्षापासून हा प्रयोग शेतकरी करीत आहेत. निसर्गाचा लहरीपणा आणि वातावरणातील बदलामुळे धान शेतीवर कीडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मकाची लागवड केली असून हा प्रयोग तालुक्यात यशस्वी होताना पाहवयास मिळत आहे. धान शेतीमध्ये अधिकचा खर्च अन् उत्पादन कमी अशी अवस्था झाल्याने शेतकऱ्यांनी हा बदल केला आहे. सलग दुसऱ्या वर्षी मक्याचे उत्पादन घेतले गेल्याने अजून क्षेत्र वाढेल असा अंदाज वर्तवला आहे.
कमी खर्चात अधिकचे उत्पादन
पाण्याची उपलब्धता असल्यावर मक्याचे उत्पादन पदरी पडतेच शिवाय या पिकावर कीड-रोगराईचा प्रादुर्भाव हा जाणवत नाही. त्यामुळे खर्चही कमी होतो. वडसा तालुक्यात एकलपूर कोरेगाव चोप बोळधा या गावांत मक्याचे क्षेत्र वाढत आहे. चार महिन्यांमध्ये हे पीक पदरात पडते. शिवाय अधिकच्या मशागतीचीही गरज नाही. एकरी ३० ते ३५ क्विंटलचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळत असल्याने धान शेतीला हा उत्तम पर्याय उभा राहत आहे. पाण्याची उपलब्धता असल्यावर कमी खर्चात अधिकचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळत आहे.
धान पिकासाठी मूबलक पाणी
धान पिकांमध्ये सर्वाधिक भात शेतीचा सहभाग आहे. याकरिता पाण्याची आवश्यकता तर आहेच पण दिवसेंदिवस वातावरणात होत असलेल्या बदलामुळे किडीचाही प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे खर्च अधिक आणि उत्पादन कमी अशी अवस्था निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांनी मकाची लागवड केली आहे. उन्हाळ्यात धान शेतीसाठी तर अधिकचे पाणी लागते. त्यामुळेच भाताचा तालुका म्हणून ओळख असलेल्या वडसा तालुका मागील वर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणत मक्याचे उत्पादन झाले होते.त्यामुळे मका शेतकऱ्यांना धान पिकाला चांगला पर्याय म्हणून मक्याची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे.