रांगी येथील प्रकल्प स्तरीय क्रिडास्पर्धेत भाडभिड बिट अव्वल

181

– द्वितीय विजेते ठरले कारवाफा बिट
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, १२ ऑक्टोबर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत रांगी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या क्रीडांगणावर गडचिरोली प्रकल्पस्तरीय तीन दिवसीय क्रीडा संमेलनाचा समारोप मंगळवार ११ ऑक्टोबर रोजी झाला. या क्रीडा स्पर्धेत भाडभिडी बिट अव्वल ठरला तर कारवाफा बिटाने द्वितीय स्थान प्राप्त केले. विजेता व उपविजेता संघाला चषक देऊन गौरविण्यात आले.
पारितोषिक वितरण सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. मैनक घोष यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून रांगीच्या सरपंचा फालेश्वरी गेडाम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनायक किरंगे, सहायक प्रकल्प अधिकारी प्रभु सादमवार, अनिल सोमनकर, सुधाकर गौरकर, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एस. आर. मैंद, रांगी शाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक अजय आखाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. मैनक घोष म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांंनी आपल्या क्रीडा कौशल्याच्या जोरावर जिल्हा पातळीवरून राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव चमकावे यासाठी अथक परिश्रम घ्यावे असे आवाहन केले.
संमेलनात कारवाफा, भाडभिडी, सोडे, अंगारा, कोरची या पाच बिटातील २४ शासकीय तर १६ अनुदानित अशा एकूण ४० आश्रमशाळेतील एक हजार साठ खेळाडूंनी सहभाग घेतला. १४, १७ व १९ वर्ष वयोगटात कबड्डी, खो – खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, रिले आदी सांघिक व लांबउडी, उंचउडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, धावणे आदी वैयक्तिक खेळाचे आयोजन केले होते.
या संमेलनात भाडभिडी बिट संघाने ३३६ गुण प्राप्त करून विजेतेपद पटकाविले. उपविजेता कारवाफा बिट संघाला ३२३ गुण मिळाले. विजेत्या भाडभिडी बिटात भाडभिडी, रेगडी, मार्कंडादेव या शासकीय व गुंडापल्ली, अड्याळ, कन्हाळगाव, चामोर्शी येथील अनुदानित आश्रमशाळांचा समावेश आहे. उपविजेत्या कारवाफा बिटात कारवाफा, पोटेगाव, पेंढरी, गडचिरोली, गोडलवाही या शासकीय व गट्टा, गिरोला, चांदाळा येथील अनुदानित आश्रमशाळांचा समावेश आहे. स्पर्धांमधून आदिवासी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त क्रीडागुण प्रदर्शित झाले. अनेक अटीतटीच्या लढतीत आदिवासी खेळाडूंचे कौशल्य दिसून आले.
कार्यक्रमाचे संचालन विभागीय क्रीडा समन्वयक संदीप दोनाडकर यांनी केले. अहवाल वाचन रांगीचे मध्यामिक शिक्षक एम. एम. कुनघाडकर तर आभार मुख्याध्यापक अजय आखाडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बी. जी. सोमनकर, धनंजय वाणी, किशोर येळणे, अनिल कुरुडकर, अतूल चौके, दीक्षा वंजारी, सुधीर शेंडे, सतीश पवार, सुभाष लांडे, राजेशकर कराडे, रामचंद्र टेकाम, अमित मेश्राम, विनायक क्षीरसागर, अनिल सहारे, ज्ञानेश्वर घुटके, दीपक भोयर, सुधीर झंजाळ, विनोद चलाख, आनंद बहिरेवार, माणिक मैंद, प्रमिला दहागावकर, प्रतिभा बानाईत, महेश बोरेवार आदींसह कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास क्रीडा शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here