– राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय
The गडविश्व
मुंबई : राज्य विधिमंडळाचे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होणार आहे. अधिवेशनाबाबत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र येत्या 15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होईल.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 फेब्रुवारी 2022 पासून नागपूर येथे घेण्याचे हिवाळी अधिवेशनात घोषित करण्यात आले होते. मात्र, अधिवेशन नागपूर येथे घेण्याबाबत विधान मंडळ सचिवलयाने प्रतिकूल अहवाल दिला आहे. या अहवालावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याचा राज्य सरकारचा मानस होता. अधिवेशनात राज्यपालांचे अभिभाषण होणार आहे. मात्र, या अभिभाषणासाठी नागपूरमध्ये संयुक्त सभागृह नाही. नागपूरमधील आमदार निवासाचा वापर सध्याच्या कोरोना काळात विलगीकरणसाठी केला जात आहे. त्यामुळे आताच्या घडीला नागपूरमध्ये अधिवेशन घेणे शक्य नसल्याचे विधानमंडळ सचिवालयाने कळविल्याची माहिती मलिक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. आता याबाबतची माहिती राज्यपालांना देण्यात येईल. त्यांनतर 15 फेब्रुवारीला होणाऱया कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय होईल, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.