The गडविश्व
नागपूर : राज्यातील पोलीस भरतीमध्ये काही जिल्ह्यात डमी उमेदवारांनी लेखी आणि मैदानी चाचणी परीक्षा दिल्याचे उघडकीस आले होते. धक्कादायक म्हणजे डमी उमेदवाराचे हे जाळ राज्य राखीव पोलीस दलाच्या परीक्षेतही आढळून आले असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी नागपुरातील नवीन कामठी आणि एमआयडीसी तीन उमेदवारांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य राखीव दलाच्या वतीने शहरातील काही केंद्रावर डिसेंबर 2021 मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यात शहरातील दोन केंद्रांवर डमी उमेदवार बसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नवीन कामठी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील केसरीमल पोरवाल कॉलेजच्या केंद्रावर शंकर आदमने याच्या जागेवर डमी उमेदवार परीक्षा देत असल्याचे व्हीडिओ फुटेजमध्ये आढळून आले. तर एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजच्या केंद्रावर ऋषिकेश वसू आणि समाधान दामू यांच्या जागेवर डमी उमेदवाराने परीक्षा दिल्याचे दिसून आले. या संपूर्ण लेखी परीक्षेचे व्हिडीओ चित्रिकरण छायाचित्रण सुद्धा करण्यात आले होते. याप्रकरणी पडताळणी केल्यानंतर पुणे ग्रामीणच्या दौंड पोलिसाच्या हे सत्य समोर आले. याप्रकरणी घटनास्थळ नागपूर असल्याने नागपुरातील एमआयडीसी आणि नवीन पोलीस स्टेशनमध्ये फसवुणकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.