The गडविश्व
गडचिरोली, ३ ऑक्टोबर : व्यसनापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवत व्यसनमुक्त विद्यार्थी घडविण्याच्या उद्देशाने मुक्तिपथ अभियान अंतर्गत अहेरी तालुक्यातील दुर्गम भागातील रामाय्यापेठ येथील शाळेच्या विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून व्यसनाचे दुष्परिणाम पटवून देत जागृती करण्यात आली. या उपक्रमामध्ये सहभागी ४८ विद्यार्थ्यांनी यावेळी व्यसनमुक्त राहण्याचा संकल्प घेतला.
उपक्रमात तंबाखू व दारू व्यसनाबाबत गावातील ८ ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. जे विद्यार्थी तंबाखू, खर्रा खात नाही त्यांनी पुढे खाऊ नये. वर्गातील किंवा गावातील सहकारी मित्र खात आहे, त्यांना खाण्यापासून वाचवावे, वडील-आई खर्रा खात असल्यास त्यांना खाऊ नका, अशी विनंती करावी. दुकानात खर्रा किंवा तंबाखू पदार्थ आण्यास जाऊ नये. कुणी आग्रह केल्यास नाही म्हणावे. विद्यार्थ्यांनी गावाचे व शाळेचे व्यसनमुक्तीचे सैनिक बनावे व भविष्यात व्यसनाच्या मार्गाला लागू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
दरम्यान, शाळेत गीत, तार टपाल टेलिफोन, डॉज बाल अशा विविध खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आली. व्यसनाचे दुष्परिणाम व गांभीर्य सांगण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ‘आमची शाळा तंबाखूमुक्त करु’ असा संकल्प घेतला. यावेळी सरपंच नंदू तेलामी, शिक्षिका अनिता रसगंटीवार, शिक्षिका सुरेखा आत्राम उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन तालुका प्रेरक आनंदराव कुम्मारी, स्पार्क कार्यकर्ता स्वप्निल बावणे यांनी केले.