– गोंदिया-बल्लारशा रेल्वेमार्गावरील घटना
The गडविश्व
गोंदिया : बल्लारशा रेल्वे मार्गावर कोरंभी राखीव वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक- २६० मध्ये रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाल्याची घटना आज शनिवार ११ जून रोजी उघडकीस आली. मृत वाघाचे वय अंदाजे ६- ७ वर्षे असल्याचे सांगण्यात येते. तालुक्यात ६ महिन्यांत वाघाच्या मृत्यूची ही दुसरी घटना आहे.
प्राप्त माहितीनुसार कोरंभी -चारभट्टी देवस्थान मार्गादरम्यान गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्ग आहे. शुक्रवारी १० जून रोजी रात्रो या मार्गाने जाणाऱ्या रेल्वे गाडीने वाघाला धडक दिली. आज शनिवार ११ रोजी सकाळी या रेल्वे मार्गाची गस्त घालणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मृत वाघाची माहिती वनविभागाला दिली. वाघाची कंबर व डाव्या पायाची मांडी तुटलेली आहे. त्याच्या शरीरावर मागील बाजूस खरचटले आहे. वाघाच्या शरीराचे सर्व अवयव शाबूत असून ही दुर्घटना शुक्रवारी रात्री गोंदिया-बल्लारशा रेल्वेने झाली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
घटनेची माहिती होताच घटनास्थळी गोंदियाचे उपवनसंरक्षक कुलराजसिंह, नवेगावबांधचे प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी दादा राऊत, वनपरिक्षेत्राधिकारी श्रावण खोब्रागडे, मानद वन्यजीव रक्षक मुकुंद धुर्वे, क्षेत्र सहायक वासुदेव वेलतुरे, उमेश गोटेफोडे, वनरक्षक प्रियंका राऊत व वनकर्मचारी उपस्थित होते.