The गडविश्व
गडचिरोली, २६ जुलै : चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी येथील गाव संघटनेच्या महिलांनी विक्रेत्याकडील २ हजार ५०० रुपयांची दारू नष्ट करीत त्याच्याविरोधात चामोर्शी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
लखमापुर बोरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित गाव संघटनेच्या सभेत अवैध दारूविक्रीमुक्त गाव निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मुक्तीपथ ग्रापं समीतीच्या पुढाकारातून मागील दोन महिन्यांपासून गावातील अवैध दारूविक्री बंद आहे. मात्र, गाव संघटनेच्या महिला शेती कामात व्यस्त असल्याचा फायदा घेत एका विक्रेत्याने चोरट्या मार्गाने आपला अवैध व्यवसाय सुरु केला. यासंदर्भातील माहिती मिळताच गाव संघटनेच्या महिलांनी संबंधित विक्रेत्याकडील २ हजार ५०० रुपयांची ३० निपा देशी दारू जप्त करून नष्ट केली. त्यांनतर विक्रेत्याविरोधात चामोर्शी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. तसेच संबंधित दारूविक्रेत्याने यापुढे अवैध दारूचा व्यवसाय करणार नाही, अशी हमी दिली. यावेळी सरपंच किरण सुरजागडे, मंगला सपन दास, सूमित्रा सातपुते, योगिता मडावी, महादेव मोगरकर यांच्यासह गाव संघटनेच्या महिला उपस्थित होत्या.
गाव संघटनेच्या पुढाकारातून लखमापूर बोरी येथे अवैध दारूविक्री बंद आहे. गावापासून १ किमी अंतरावर असलेल्या भिक्षी माल येथे ठोक व किरकोळ दारूविक्री केली जाते. यामुळे गावातील मद्यपी भिक्षी माल येथे जाऊन दारू पितात. त्यामुळे संबंधित गावातील दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्यासंदर्भात पोलिस अधीक्षक व चामोर्शी पोलिस स्टेशन मध्ये निवेदन देण्यात आले आहे. या गावातील दारूविक्री तत्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी गाव संघटनेच्या महिलांनी केली आहे.