लग्नात भेट दिलेल्या टेडी बेअरचा स्फोट ; नवविवाहित तरुण गंभीर जखमी

1623

– दोन्ही डोळे निकामी, एका हाताचे मनगट छाटले

The गडविश्व
अहमदाबाद : लग्नात भेट दिलेल्या टेडी बेअरचा स्फोट होऊन नवविवाहित तरुण गंभीर जखमी झाल्याची धक्कदायक घटना गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात मितांबरी येथे घडली. या घटनेत नवविवाहित तरुणाने आपल्या एका हाताचे मनगट व दोन्ही डोळे गमवावे लागले आहे. त्यासोबतच तीन वर्षांचा पुतण्याही गंभीररित्या भाजला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात मितांबरी गाव आहे. तेथे १२ मे रोजी लतेश गावित नावाच्या तरुणाचा सलमा नावाच्या तरुणीशी विवाह झाला होता. लग्नानंतर ५ दिवसांनी म्हणजेच १७ मे रोजी लग्नात मिळालेल्या भेटवस्तू पाहत होता. त्याला भेटवस्तूमध्ये एक मोठा टेडी बेअर मिळाला, तोही वायर्ड होता. हे खेळणे पाहण्यासाठी लतेशने त्याच्या ३ वर्षांच्या पुतण्यालाही बोलावून घेतले. नवविवाहित तरुणाने ते गिफ्ट उघडून पाहिले आणि विद्युत प्लगमध्ये वायर टाकली आणि त्याचवेळी मोठा स्फोट झाला. या घटनेत तरुणाचे दोन्ही डोळे निकामी झाले असून एका हाताचे मनगट छाटले गेले आहे. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज गावात दूरपर्यंत ऐकू आला. आवाज ऐकून घरातील सदस्य खोलीकडे धावत आले असता लतेश आणि त्याचा पुतण्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत होते. लतेशच्या डाव्या हाताचे मनगट तुटले असून दोन्ही डोळ्यांनाही इजा झाली त्याचवेळी पुतण्याच्या अंगातून रक्त वाहत होते.
लतेशचे सासरे हरीश भाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या च्या मुलीचा लग्नापूर्वी राजू धनसुख पटेल नावाचा तरुण पाळत ठेवत होता. त्यांनी हे टेडी बेअर गावातील एका आशा वर्करकडे पाठवले होते. त्यावेळी गर्दीमुळे ती भेट पाठवणाऱ्या व्यक्तीकडे कोणी लक्ष दिले नव्हते, मात्र आता या घटनेमागे मोठे षडयंत्र असल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी जखमी तरुण लतेश गावित याच्या कुटुंबीयांनी वासंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नातेवाइकांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी राजू पटेल याला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. दुसरीकडे, पीडित तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here