The गडविश्व
गडचिरोली, ३० जुलै : जिल्ह्यातील सर्वच शासकीय रुग्णालयात सर्प दंशावर प्रतीबंध म्हणून ॲन्टीस्नेक व्हेनम च्या च्या लसी उपलब्ध आहेत. तेव्हा कोणत्याही प्रकारच्या सापांनी दंश केला तरी वास्तविक पाहता एकही रुग्ण दगावायला नको. असे असतांना गडचिरोली जिल्ह्यात केवळ दिड महिन्यात मोठ्या संख्येने सर्प दंशाने रुग्ण दगावले असतील तर ही घटना निश्चितच अत्यंत वेदनादायी बाब म्हणावी लागेल असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प विभागचे राज्य सहकार्यवाह विलास निंबोरकर व्यक्त केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा गडचिरोलीच्या वतीने सापा बाबतीत लोकांमध्ये असलेले समज- गैरसमज दूर करण्यासाठी गावोगावी प्रसार व प्रचार केले जाते. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर सुद्धा आम्ही प्रत्येक भारतीय नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवू शकलो नाही, हीच आमच्यासाठी लाजीरवाणी बाब म्हणावी लागेल. एकिकडे जादूटोणा विरोधी कायदा २०१३ अमलात येऊन ९ वर्ष होत आहेत परंतु या कायद्याची माहिती जनमानसात निट पोहचलेली नाही. व या कायद्याची अंमलबजावणी ज्या विभागाकडे सोपवलेली आहे त्यांनाही याचे पुरेसे ज्ञान नाही म्हणून बुवा, बाबा, अंम्मा , मांत्रिक यांच्या वर ज्या पद्धतीने वचक बसायला पाहिजे ते होत नाही. याउलट या कायद्याचा दुरुपयोग जास्त होत आहे असे लक्षात येते. ग्रामिण भागातील लोकांना विषारी व बिनविषारी सापांची जाणिव नसते. बिनविषारी सापांच्या दंशाने रुग्ण दगावत नाही. म्हणून असे रुग्ण मंत्रोपचारानंतर किंवा एखाद्या मंदिरात केवळ काही वेळ बसविल्यानंतर बरे वाटून चांगले होतात त्यामुळे याचे श्रेय ते संबंधित मांत्रिक, बुवा, बाबा किंवा एखाद्या पवित्र स्थळाला देतात. जेव्हा की अशा घटनेत तो रुग्ण दगावणारच नसतो आणि विषारी साप ज्यात नाग, मन्यार, घोणस व फुरसे अशा सापांनी दंश केल्यास ॲनटीस्नेक व्हेनम लसीशिवाय त्याला कोणीही वाचवू शकत नाही. अशी लस रुग्णांना एक तासाच्या आत मिळणे आवश्यक आहे. परंतु कित्येकदा रुग्णांना रुग्णालयात नेण्या आधी जळीबुटी किंवा सांगोपांगी माहिती वरून गावठी इलाज करण्यात वेळ घालवला जातो आणि रुग्णांवर प्राण गमविण्याची पाळी येते. ज्यांना विषारी व बिनविषारी साप ओळखता येत नाही अशांनी विना विलंब रुग्णांना रुग्णालयात नेल्यास रुग्णांचे प्राण शतप्रतिशत वाचवता येते. तेव्हा जनतेनी वरील बाबी अमलात आणून रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन महा अंनिस चे वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प विभागचे राज्य सहकार्यवाह विलास निंबोरकर यांनी केले आहे.
साप वाचविणे काळाची गरज. साप हा पर्यावरणातील एक महत्त्वाचा घटक आहे. सापाच्या दंशाने जरी व्यक्ती दगावतो असे वाटत असले तरी तो जाणिव पुर्वक दंश करीत नसतो. बऱ्याच अंशी त्याला आपणच जबाबदार असतो. साप हे माणसाचे शत्रू नसून ते मित्रच आहेत. शेतातील धान्याचे उंदरापासून तो संरक्षण करीत असतो. सापांचे प्रमाण कमी झाले तर ऊद्या चालून शेतात उंदराचे प्रमाण वाढायला लागले तर त्यांचे प्रतिबंध करण्यासाठी पुन्हा विषारी द्रव्ये खरेदी करावे लागतील किंवा साप खरेदी करून परत शेतात सोडावे लागतील याचाही शेतकरी बांधवांना विचार करावा लागेल.
सर्पमित्रांशी संपर्क साधा
गडचिरोली जिल्ह्यात सर्व प्रकारच्या सापांना विनामूल्य पकडून त्यांना जीवनदान देणारे काही सर्पमित्र आहेत. अशा सर्पमित्रांचे मोबाईल नंबर बाळगल्यास ते केव्हाही तयार असतात. यासाठी त्यांना कोणाकडूनही मानधन मिळत नसते, ते पैशाची अपेक्षाही करत नसतात परंतु किमान त्यांच्या गाडीसाठी लागणाऱ्या पेट्रोल पाण्याचा विचार केल्यास त्यांनाही आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार नाही याचा सर्वांनी विचार करावा.
सर्प मित्र व त्यांचे संपर्क नंबर ( अजय कुकडकर 9545491059, प्रा. विलास पारखी 8805135877)
भोंदू लोकांपासून सावध रहा
विषारी साप चावल्यानंतर कोणतेही विष मंत्रोपचाराने शरीरातून बाहेर काढले जावू शकत नाही. तसेच जळीबुटीद्वारे सुद्धा विषमुक्त करता येते हे शतप्रतिशत खात्रीने कोणी सांगू शकत नाही. व अशी हमी देऊन कोणी उपचार करत असेल आणि त्यानंतर रुग्ण दगावत असेल तर अशा अघोरी उपचार करणाऱ्या व्यक्तीवर जादुटोणा विरोधी कायदा २०१३ अंतर्गत किमान पाच हजार ते कमाल पंन्नास हजार रुपये दंड व शिक्षा किमान सहा महिने ते कमाल सात वर्ष कारावास होऊ शकते.
काळजी घ्या, जीव वाचवा, सापही वाचवा पुढच्या पिढ्यांसाठी पर्यावरण वाचवा.