– पक्षकाराच्या हस्ते राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्धघाटन
The गडविश्व
चंद्रपूर : मा. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार यावर्षीची ही पहिलीच राष्ट्रीय लोक अदालत आहे. गत वर्षी तीन राष्ट्रीय लोक अदालतीमधून जिल्ह्यात सात हजार प्रकरणे तड़जोडीने निकाली काढण्यात आली होती. तर आजच्या लोक अदालतीमध्ये १३ हजारांहून अधिक प्रकरणे ठेवण्यात आली आहेत. “न्याय आपल्या दारी” या संकल्पनेनुसार विधिसेवा प्राधिकरण आपल्यापर्यंत पोहचत आहे. पक्षकारांनीसुद्धा लोक अदालतीच्या माध्यमातून आपली प्रलंबित प्रकरणे निकाली काढून आयुष्यातील महत्वाचा वेळ आणि पैसा वाचवावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी केले.
जिल्हा न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतमध्ये अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर न्या. केदार, अपर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव किरण जाधव आदी उपस्थित होते.न्यायालयाच्या लढाईत आयुष्याचा बराच काळ निघुन जातो, असे सांगून श्रीमती अग्रवाल म्हणाल्या, वेळ न घालवता प्रलंबित प्रकरणे आपसी तड़जोडीने त्वरीत निकाली काढण्यासाठी लोक अदालतीचे आयोजन करण्यात येते. पैनल वर असलेल्या सर्व न्यायाधीशांनी त्यांच्याकडे असलेली जास्तीत जास्त प्रकरणे आज निकाली काढावित. पक्षकाराचे न्यायालयीन प्रकरण निकाली निघाले तर त्याला मानसिक समाधान लाभते. शिवाय त्याचा वेळ आणि पैसा सुद्धा वाचतो. सध्या परिस्थितीत बस आणि रेल्वे कमी प्रमाणात सुरू असल्यामुळे पक्षकारांना येथे पोहचण्यास वेळ होऊ शकतो. त्यामुळे पैनलनी दुपारच्या सत्रानंतरसुद्धा त्यांची वाट पहावी, अशा सूचना प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती अग्रवाल यांनी दिल्या.
विशेष म्हणजे जानबा पाटिल आणि विजय शेंडे या पक्षकारांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. प्रस्ताविक विधीसेवा प्राधिकरणचे सचिव किरण जाधव यांनी केले. यावेळी न्यायाधीश एस. एम. मौदेकर, के. पी. श्रीखंडे, एन. एन. बोदरकर, एम. एस. काळे, स्नेहा जाधव, ए. एन. माने, एन.एम. पंचारिया, आर.व्ही. मेटे यांच्यासह लॉ कॉलेजचे विद्यार्थी, पक्षकार आदी उपस्थित होते.