– गडचिरोली जिल्ह्यात ३ ऑगस्ट ला आगमन
– युवक,विद्यार्थ्यामंध्ये अधिकार आणि कर्तव्याप्रती करणार जागृती
The गडविश्व
गडचिरोली, ११ जुलै : ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांना ‘मंडल आयोगाबाबत जागृती करीत त्यांना त्यांचे अधिकार आणि हक्क समजावून सांगण्यासाठी ‘मंडल दिनानिमित्त विदर्भातील सात जिल्ह्यात मंडल आयोग जनजागृती यात्रा निघणार आहे.
विदर्भातील ओबीसी, व्हीजेएनटी,एसबीसी आदी समाजातील संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक रविवारी महाराष्ट्र पर्टयन विकास महामडळाच्या सभागृहात झाली. यात हा निर्णय घेण्यात आला. १ ते ७ ऑगस्ट दरम्यान भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर,यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यात मंडल आयोग जनजागृती यात्रा निघेल. ओबीसी व्हीजेएनटी,एसबीसी समाजातील विविध प्रश्न आणि त्यावरील उपायावर चर्चा, विद्यार्थी, युवक, अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये जागृती, ओबीसींचे वसतिगृह, महाज्योतीच्या आणि ओबीसी आर्थिक विकास महामंळाच्या योजना, शिष्यवृत्तीचा लाभ, ओबीसींची जनगणना आदी अनेक विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली.
यात्रेच्या माध्यमातून ओबीसी हितासाठी गठित बी.पी. मंडल आयोगाच्या शिफारशींची माहिती ओबीसी समाजाला देऊन या शिफारशी आज परिस्थितीत शासनाने लागू करण्याची आवश्यकता या विषयावर जनजागृती करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी असलेल्या शासकीय योजना, “महाज्योती” संस्थेच्या योजना, ईतर मागासवर्गीय वित्त महामंडळाच्या योजना , ओबीसी विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षणासाठी असलेल्या शासकीय शिष्यवृत्ती योजना व जागतिक संस्थेच्या शिष्यवृत्ती योजनाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. ओबीसी जनगणना-काळाची गरज यांवर प्रकाश टाकून शासनाकडे प्रलंबित ओबीसी समाजाच्या अन्य विकासात्मक मागण्यांच्या पूर्ततेसाठी ओबीसी समाज एकीकरण या प्रमुख हेतूने यात्रेच्या माध्यमातून प्रामुख्याने कार्य करण्यात येणार आहे. सभेत ओबीसी युवा अधिकार मंच, ओबीसी अधिकार मंच,सर्व समाज ओबीसी मंच, संघर्ष वाहिनी, संविधान मंच, स्टु़डटंस राईटस असो.सेल्परिसपेक्ट मुव्हमेंट,ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवा संघ , भोयर पवार महासंघ, आता लढूया एकीनेच सारख्या अन्य बहुजन ओबीसी संघटनांचा सहभाग होता.
बैठकीत सर्व समाज संघटनांनी ओबीसी , एन.टी., व्हि.जे.एन.टी., एस.बी.सी. यां ओबीसी प्रवर्गातील नागरीकांना तसेच बहुजन समाजासाठी सामाजिक चळवळीत कार्य करणाऱ्या सामाजिक संघटनांना या यात्रेत बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुख्य विषयांसह सभेत ओबीसी विद्यार्थ्यांसाठी एस.सी. घटकांतील विद्यार्थ्यांसाठी असलेली स्वाधार सारखी योजना लागू करणे, महाज्योती संस्थेच्या योजनांची समाजात प्रचार-प्रसिद्धी करण्यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर महाज्योती सेवक यांची बार्टी संस्थेच्या समतादूत प्रमाणे नेमणूक करणे, जिल्हास्तरावर महाज्योती कक्ष स्थापित करणे, जिल्हा परिषद, नगर परिषदा, नगर पंचायती , महानगरपालिका असा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुसंख्य ओबीसी समाजाच्या विकासासाठी ओबीसी बहुजन कल्याण सभापती हे पद शासनाकडून निर्माण करवून घेणे,असंवैधानिक क्रिमीलेयरची अट रद्द केली जाणे,ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तातडीने सुरु करणे, महाज्योती संस्था ईतर संस्थांप्रमाणे आर्थिक द्रष्टिने सक्षम करणे आदीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सभेत बळीराज धोटे, दिनानाथ वाघमारे, उमेश कोराम, प्रमोद काळबांधे, अतुल खोब्रागडे, खेमेन्द्र कटरे, अशोक लंजे, श्रावण फरकाडे, नामदेव राऊत गोपाल सेलोकर, डाॅ.वैरागडे, मनोज चव्हाण, ए.ए.डेकाटे, योगीता माचमवार, अश्विनी नागुलवार, दिपक पडोळे, अर्चना कोट्टेवार, स्वाती अडेवार आदी ओबीसी पदाधिकारी एवं सदस्यगण उपस्थित होते.‘मंडल यात्रेबाबत प्रास्तविक ओबीसी युवा अधिकार ‘मंचचे प्रमुख उमेश कोर्राम यानी केले. प्रमोद काळबांधे यांनी उपस्थितांचे आभार मानले.संविधान प्रास्ताविकेचा सामुहिक पठनाने समारोप झाला.