The गडविश्व
नवी दिल्ली : केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली वर्गात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याचे वय सहा वर्ष पूर्ण असलेच पाहिजे, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. केंद्रीय विद्यालय संघटनाने (KVS) याबाबतचा निर्णय घेतला होता. पण संघटनेच्या या निर्णयावर आक्षेप घेत आधी हायकोर्टात आणि नंतर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात दोन्ही ठिकाणी केंद्रीय विद्यालय संघटनेचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या २०२२-२३ च्या शैक्षणिक वर्षात सहा वर्षांच्या चिमुकल्यांना पहिल्या इयत्तेत प्रवेश मिळणार आहे. याआधी केंद्रीय विद्यालयांमध्ये पाच वर्षांच्या मुलांनाही पहिल्या इयत्तेच प्रवेश दिला जात होता. पण आता तो निर्णय मागे घेण्यात आला आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने याबाबत ११ एप्रिलला निर्णय दिला होता. त्या निर्णयात पहिल्या इयत्तेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय हे कमीत कमी सहा वर्ष इतके हवे, असे ठरविण्यात आले होते. पण त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. या याचिकेला सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती किशन कौल आणि न्यायमूर्ती एमएम सुंदरशेठ यांच्या खंडपीठाने फेटाळले आहे.