काही लोक वादळाची चिन्हे दिसली तरी त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्याचा परिणाम म्हणजे ऐनवेळेला वादळात योग्य आसरा न मिळाल्याने मृत्यू पावतात किंवा गंभीर जखमी होतात. वीज कोसळल्याने होणाऱ्या धोक्याबद्दल माहिती देणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमांचा दृष्टीकोन हे धोके कमी करण्याचा असतो. कोणत्याही व्यक्तीला जास्तीत जास्त सुरक्षित ठिकाणी आसरा मिळाला पाहिजे. लोकांनी मोकळ्या जागेत असतांना शक्यतो लहान टेकडी, एकाकी झाड, झेंड्याचे खांब, मनोरे, माणसांनी बनवलेल्या पण आजूबाजुच्या जमिनीपेक्षा फार उंच असलेल्या जागांचा आश्रय टाळावा, तसेच विजेपासून संरक्षण मिळण्यासाठी कोणत्याही जागा पूर्णपणे सुरक्षित नसतात पण तरीही बंदिस्त इमारती किंवा चारचाकी वाहने, ट्रक, बस, व्हॅन, शेतातील बंदिस्त वाहने ही त्या मानाने बरीच सुरक्षित, आसरा घेण्यासारखी ठिकाणे आहेत. भारतात वीज कोसळण्यामुळे होणारे जास्तीत जास्त मृत्यू हे शेतावर काम करणांऱ्या लोकांचे असतात. महाराष्ट्रातील विजेमुळे होणाऱ्या एकूण मृत्यूपैकी 86 टक्के मृत्यू शेतावर काम करणांऱ्या व्यक्तींचे असतात. गडचिरोली जिल्हयात सन 2017 पासून 67 जण वीज अंगावर पडल्याने मृत्यूमुखी पडले आहेत. तसेच 30 जण जखमी झाले आहेत. 400 हून अधिक पशूहानी मागील चार वर्षात झाल्याची आकडेवारी आहे.
वीज ही गुराढोरांसाठी अनिष्टच असते. वादळात बहुधा गुरेढोरे झाडाखाली एकत्र गोळा होतात आणि विजेच्या एका झटक्याला अनेक गुरे बळी पडतात. वादळी हवा जाणवताच गुरांना गोठ्यामध्ये किंवा प्राधान्याने जिथे विजप्रतिबंधक योजना असते अशा सुरक्षित ठिकाणी नेऊन धोका कमी करता येऊ शकतो. विद्युत व टेलिफोनच्या तारा ह्या जमिनीखालून नेण्यामुळे वीज कोसळण्याने होणारे नुकसान खूपच कमी होते. परंपरागत पध्दतीने खांबावरुन जाणाऱ्या तारा विद्यूत प्रवाहाबरोबरच विजेलाही इमारतीपर्यंत वाहून नेतात, त्यामुळे विद्युत उपकरणांचे आणि इमारतींचेही नुकसान होते.
मेघगर्जना आणि वीज, वादळ होत असतांना तुम्ही घराबाहेर असाल, तर त्वरीत आसरा शोधा, इमारत हा सुरक्षित आसरा आहे. पण इमारत नसेल तर तुम्ही गुहा, खड्डा किंवा खिंडीसारख्या भागात आश्रय घ्यावा. झाडे ह्यासाठी कधीच सुरक्षित नसतात. उंच झाडे स्वत:कडे विजेला आकर्षित करतात. तुम्हाला आसरा मिळाला नाही तरी परिसरातील सर्वात उंच जागा टाळा. जर जवळपास फक्त उंच झाडे असतील, तर झाडाच्या उंचीच्या दुप्पट अंतरावर थांबा. जमिनीवर वाका किंवा वाकून बसा, घरातच राहा किंवा बाहेर असाल, तर घरी जा. जर वादळाची चाहूल लागली, तर अगदी गरजेचे नसेल तर बाहेर जाणे टाळा. लक्षात ठेवा विजेचा प्रकाश आणि आवाज हयातील अंतर जितके सेकंद असेल, त्याला तीनने भागले असता वीज ज्या ठिकाणी कोसळली तिथपर्यंतचे अंतर किलोमीटर अंदाजे कळू शकते. जेव्हा विजा चमकणे किंवा वादळ खूप जोरात चालू असेल, तेव्हा विजेच्या सुवाहकांपासून दूर रहा. उदा.धुराडी, रेडिएटर्स, स्टोव्ह, धातूचे नळ, ओल्या जागा आणि टेलीफोन. पाण्यात असाल तर पाण्यातून तात्काळ बाहेर या, छोटया नावेतून पाण्यातून जात असाल तरीही. जर तुम्हाला विद्युत भारित वाटत असेल, तुमचे केस उभे असतील किंवा त्वचेला मुंग्या येत असतील तर तुमच्यावर वीज कोसळण्याची शक्यता आहे. त्वरीत जमिनीवर ओणवे व्हा किंवा गुडघ्यात मान घालून बसा.
घरात असताना विद्युत उपकरणे चालू करुन वापरु नका. जसे की, हेअर ड्रायर, विद्युत टूथब्रश किंवा विद्युत रेझर, जर वीज तुमच्या घरावर किंवा घराजवळ कोसळली तर तुम्हाला विजेचा धक्का बसू शकतो. वादळात टेलीफोनचा वापर टाळा . वीज टेलिफोनच्या घरावरील तारांमधुन वाहू शकते. बाहेर असतांना धातूच्या वास्तुंचा वापर टाळा. विजा चमकत असतांना सर्वात सुरक्षित ठिकाण म्हणजे बदिस्त इमारत, सहलीसाठीचे तंबू किंवा पडवी सुरक्षित नाही. दुसरे सुरक्षित ठिकाण म्हणजे धातूचे बंदिस्त वाहन. जसे चारचाकी गाडी, ट्रक, व्हॅन इ.पण मोटरसायकल किंवा हलक्या छताची वाहने नाही. सुरक्षित इमारत म्हणजे ज्याला भिंती, छप्पर, फरशी असेल जसे की -घर, शाळा, कार्यालयाची इमारत किंवा बाजाराच्या इमारती. धातू असलेल्या वाहनाच्या भागाला स्पर्श् करु नका. जेव्हा डोक्यावर गडद काळे ढग जमू लागतात किंवा पहिल्यांदा वादळाचा आवाज येतो. तेव्हाच सुरक्षित आसरा शोधा. उंच एकाकी झाडाखाली आसरा घेऊ नका. झाडामुळे तुम्ही कदाचीत कोरडे राहाल. पण विजेमुळे होणाऱ्या हानीची शक्यता तिथेच जास्त आहे. पावसामुळे तुमचा मृत्यू होणार नाही, पण विजेमुळे होऊ शकेल. पुलाखाली उभे राहून वादळ जाण्याची वाट पहा. पुलाच्या लोखंडी तुळया-कमानींना स्पर्श करु नका. तुमच्या दुचाकीपासून दुर अंतरावर थांबा.शक्यतो कोरडया जागेवर थांबा, पूल हा स्थापत्यशास्त्रनुसार काळजीपूर्वक बांधलेला असतो. पूल जरी जमिनीपासून उंचावर असला आणि जर त्यावर वीज कोसळली तरी विजेचा प्रवाह सुरक्षितपणे जमिनीत जातो. एखादा पूल शोधा, पाण्यापासून दूर रहा. धातुच्या वस्तूंपासून दूर रहा. जर पुलाखाली उभे असाल,तर पाण्याच्या सतत वाढणाऱ्या पातळीची दखल घ्या.
उच्च दाबाच्या तारा रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जात असतील त्याच्या खूप जवळ जाऊ नका. कमीत कमी 50 फूट अंतर सोडा. तर विज ह्या तारांवर किंवा मनोऱ्यावर कोसळली,तर विजेचा प्रवाह सुरक्षितपणे या तारांतून जमिनीत निघून जावा,अशीच त्यांची रचना असते.
अचानक आलेल्या वादळात घ्यायची काळजी : छत्र्या, कोयते, सुऱ्या, लोखंडी काठी अशा धातूच्या वस्तूंची जवळीक टाळा. विशेषत: त्या वस्तू आपल्या उंचीवर असतील तर वीज पडताना पाहणे किंवा ऐकणे धोकादायक असते. अचानक आलेल्या वादळाच्या वेळी झाडाजवळ असाल, तर शरीराची रचना ही खाली वाकून पायात डोके घालून बसलेली असावी जमिनिवर बसा, दोन्ही पावले जमिनीवर ठेवा, पाय गुडघ्यात दुमडून एकमेकांना जोडा आणि त्या भोवती हातांचा विळखा घाला. हनुवटी गुडघ्यावर दाबून धरा.
जर तुमच्या आसपास अथवा कोणा व्यक्तीवर वीज पडली तर ताबडतोब वैद्यकीय मदत मिळवा. बाधित व्यक्तीवर प्राथमिक उपचार करतांना या गोष्टींचा विचार करा. श्वासोच्छवास जर थांबला असेल, तर त्या व्यक्तीच्या तोंडावर तोंड ठेवून कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा. त्यामुळे त्या व्यक्तीच्या श्वासोच्छवास नैसर्गिकरीत्या सुरु होण्यास मदत होईल. ह्दयाचे ठोके थांबले असल्यास सीपीआरचा उपयोग करावा. नाडीचा ठोका चालू असेल आणि श्वासोच्छवास चालू असेल, तर इतर काही जखमा, अंगावर भाजल्याच्या खुणा, हाडांच्या इजा ह्या बाबत तपासणी व नोंद करा. दृष्टी ठीक आहे ना व ऐकू येत आहे ना अशा इतर हालचाली यांची नोंद घ्या.
(जिल्हा माहिती कार्यालय गडचिरोली द्वारा जनहितार्थ प्रसारित)