व्यसनाबाबत ९६२ विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

247

– चामोर्शी तालुक्यातील सहा शाळांमध्ये उपक्रम
The गडविश्व
गडचिरोली, २५ ऑगस्ट : व्यसनापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवत व्यसनमुक्त विद्यार्थी घडविण्याच्या उद्देशाने मुक्तिपथ अभियानाने विशेष कार्यक्रम सुरु केले आहे. या अंतर्गत चामोर्शी तालुक्यातील सहा शाळांमधील विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून व्यसनाचे दुष्परिणाम पटवून देत जागृती करण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून एकूण ९६२ विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचे धडे गिरविले.
चामोर्शी तालुक्यातील सहा शाळांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपक्रमात तंबाखू व दारू व्यसनाबाबत गावातील ८ ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. जे विद्यार्थी तंबाखू, खर्रा खात नाही त्यांनी पुढे खाऊ नये. वर्गातील किंवा गावातील सहकारी मित्र खात आहे, त्यांना खाण्यापासून वाचवावे, वडील-आई खर्रा खात असल्यास त्यांना खाऊ नका, अशी विनंती करावी. दुकानात खर्रा किंवा तंबाखू पदार्थ आण्यास जाऊ नये. कुणी आग्रह केल्यास नाही म्हणावे. विद्यार्थ्यांनी गावाचे व शाळेचे व्यसनमुक्तीचे सैनिक बनावे व भविष्यात व्यसनाच्या मार्गाला लागू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच गीत, तार टपाल टेलिफोन ,डॉज बाल अशा विविध खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आली. व्यसनाचे दुष्परिणाम व गांभीर्य सांगण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ‘आमची शाळा तंबाखूमुक्त करु’ असा संकल्प घेतला. हा उपक्रम सुभाषग्राम येथील इंदिरा गांधी हायस्कुल ५३० विद्यार्थी, रामकृष्णपूर येथील जिप शाळा ११९, बहादूरपूर ११५, गौरीपूर १००, नवेगाव ३२, सगणापूर जिप शाळा ६६ व भगवंतराव हायस्कुल ६२ या शाळांमध्ये राबविण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here