शहरातील व नजीकच्या गावांतील अवैध दारूविक्री बंद करा

402

– मुक्तिपथ दारू विक्रीबंदी शहर संघटनेची मागणी
The गडविश्व
गडचिरोली : शहरातील व लगतच्या गावातील अवैध दारूविक्री त्वरित बंद करावी, अशी मागणी मुक्तिपथ दारू विक्रीबंदी शहर संघटनेने केली आहे. यासंदर्भातील निवेदन गडचिरोलीचे ठाणेदार अरविंदकुमार कतलाम यांना सादर करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्हा हा दारूबंदी जिल्हा आहे. तरी सुद्धा गडचिरोली शहरातील काही वार्डात व लगतच्या गावात राजरोसपणे दारूविक्री सुरु आहे. यामुळे वॉर्डातील व गावातील नागरिकांसह महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वार्डातील व लगतच्या गावातील दारू विक्री बंद करण्यासाठी मुक्तिपथ शहर संघटनेच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानुसार शहर व लगतचे गाव दारूमुक्त करण्यासाठी अवैध दारूविक्रेत्यांची यादी तयार करून यादीत समाविष्ट असलेल्या दारूविक्रेत्यांवर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांना सादर करण्यात आले. तसेच निवेदनाचा पाठपुरावा घेण्याहेतूने पुढील महिन्यात पोलिस निरीक्षक यांच्या उपस्थितीत संघटना सदस्यांची बैठक पोलीस स्टेशन मध्ये घेण्यात येणार आहे. यासंदर्भातील निवेदन मुक्तिपथ जिल्हा समितीचे जिल्हाध्यक्ष जिल्हाधिकारी, तालुका समितीचे अध्यक्ष तहसीलदार व उपविभागीय पोलिस अधिकारी यांना सादर करण्यात आले आहे.
निवेदन देतेवेळी गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे, मुक्तिपथ अभियानचे उपसंचालक संतोष सावळकर, सामाजिक कार्यकर्ते मनोहर हेपट, राष्ट्रवादीचे प्रकाश ताकसांडे, उपेंद्र रोहणकर, जिल्हा दारूबंदी समितीचे सदस्य विलास निंबोरकर, नवेगाव येथील देवाजी झाडे, लांझेडा वॉर्डातील मानकाबाई मेश्राम, गणेश कोलगिरे, रेवनाथ मेश्राम, अमोल वाकुडकर, धनराज अलोणे, राकेश ढवळे यांच्यासह विविध वॉर्डातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here