– मिशन झिरो ड्रॉपआऊट जिल्हास्तर समितीच्या सभेत सूचना
The गडविश्व
गडचिरोली, ६ जुलै : मिशन झिरो ड्रॉपआऊट जिल्हास्तर समितीची सभा जिल्हाधिकारी, गडचिरोली तथा अध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांचे प्रमुख उपस्थितीत मंगळवार ५ जुलै रोजी पार पडली. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) तथा सदस्य सचिव यांनी मिशन झिरो ड्रॉपआऊट संबंधातील सर्व स्तरावरील सर्वेक्षण ५ जुलै २०२२ ते २० जुलै २०२२ या कालावधीत करावयाचे असून या संबंधात जिल्हास्तरावरून व तालुकास्तरावरुन केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांनी मिशन झिरो ड्रॉपआऊट सर्वेक्षणात शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांची यादी तयार करुन शाळेतील जनरल रजिष्टर तसेच विद्यार्थी हजेरी व गावपंजिका पडताळणी करुन करावयाचे आहे याबाबत माहिती दिली. ३ ते १८ वयोगटातील एकही बालक शाळाबाह्य राहणार नाही या दृष्टीने कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकारी संजय मीना यांनी सूचित केले.
जिल्हाधिकारी, गडचिरोली तथा अध्यक्ष मिशन झिरो ड्रॉपआऊट जिल्हास्तर समिती यांनी सर्वेक्षणाची माहिती गुगल शिट तयार करुन त्यात दैनिक अहवाल मागविण्यात यावा असे निर्देश दिले. व स्थलांतरीत कुटुंबाचे गावपातळीवर रजिष्टर ठेण्यात यावे. शासन निर्णयातील दिलेल्या निर्देशानुसार या महत्वपूर्ण शैक्षणिक उपक्रमात महसूल, ग्रामविकास, नगर विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महिला व बालविकास, कामगार विभाग, आदिवासी विकास, अल्पसंख्यांक विकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य व गृह विभाग या विभागातील अधिकाऱ्याच्या सहभागाने मिशन झिरो ड्रॉपआऊट राबविण्यात यावे अशाही सूचना दिल्या असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.